केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरुद्ध अंगणवाडी कर्मचारी सभेचा प्रांताधिकार्यालयावर मोर्चा !
प्रतिनिधी —
क्रंतिदिनानिमित्त आज अंगणवाडी कर्मचारी सभे तर्फे संगमनेर येथे केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरुध्द प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

९ आगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा इशारा दिला. जनतेला ‘करा किंवा मरा’ असा संदेश दिला. भारतीय जनतेने केलेल्या आंदोलनामुळे ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला. स्वातंत्र्य आंदोलनातील हे महत्वाचे आंदोलन ठरले.

आज देशभर कामगार संघटना कृती समितीच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरूद्ध आंदोलन करण्यात आले आहे. संगमनेर शहरात अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने महाराष्ट्राच्या अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर व संगमनेर तालुका अध्यक्ष भारती धरत यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात, कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा, कंत्राटी पद्धत बंद करा, खाजगी करण थांबवा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, वेतनश्रेणी, पेंशन, ग्रॅज्युएटी मिळावी, रिक्त पदांची भरती करावी, मणिपूर मधील हिंसाचार थांबवावा, मणिपूर सरकारं बरखास्त करावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

मोर्चापूर्वी आगस्ट क्रांती चळवळीचे नेते महात्मा गांधींजी, मौलाना आझाद, पंडीत नेहरु, साथी राममनोहर लोहिया, साथी जयप्रकाश नारायण, साथी युसुफ मेहेरअली, अरुणा असफली यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

मोर्चा समोर ॲड. निशा शिवूरकर, भारती धरत, शांताराम गोसावी, नारंगाबाई ढोक्रे, समाजवादी जन परिषदेचे प्रा. शिवाजी गायकवाड, मंगल खर्डे, इंदुमती घुले इत्यादींची भाषणे झाली. मोर्चाच्या वतीने नायब तहसीलदार लोमटे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी हिना पटेल, कांता राहणे, संगीता पर्बत, रुपाली कांगणे इत्यादींनी प्रयत्न केले.

