वीज वितरण कंपनी वर अवलंबून न राहता आमदार निधीतून थेट शेतकऱ्यांसाठी रोहित्र !
राधाकृष्ण विखे पाटील यांचा धडक कृती कार्यक्रम !
प्रतिनिधी —

विज वितरण कंपनीकडून बंद पडलेले रोहीत्र मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेवून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहीत्रांसाठी आमदार निधीतील दोन कोटी रुपये देण्याची केवळ घोषणा न करता त्याची अंमलबजावणी सुरु केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विज टंचाईवर मात करताना विखे पाटील यांचा पॅटर्न आता राज्यात लक्षवेधी ठरत आहे.

रोहीत्रांच्या समस्यांमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. कधी बिलांच्या कारणाने तर कधी जळालेले रोहीत्र वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांची आंदोलने मध्यंतरी मोठ्या प्रमाणात सुरु झाली. विज वितरण कंपनीकडूनही या प्रश्नाबाबत कोणताही दिलासा मिळत नसल्याने राहीत्रांबाबतच्या अडचणी विखे पाटील यांच्या जनता दरबारात सातत्याने येवू लागल्या. यामध्ये कायमस्वरुपी तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा नवा पॅटर्नच यानिमित्ताने पुढे आला.

दरवर्षी शासनाकडून मिळणारा आमदार निधी रस्ते किंवा इतर विकास कामांसाठी उपयोगात आणला जातो. ही सातत्याने सुरु राहणारी प्रक्रीया आहेच, परंतू ग्रामीण भागातील जिवन विजेवरच अवलंबून असल्याने विजेच्या प्रश्नात कायमस्वरुपी उत्तर शोधण्यासाठी विखे पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून दोन कोटी रुपये फक्त रोहीत्रांसाठी उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, याची अंमलबजावणी सुरु झाली. आत्तापर्यंत ४ रोहीत्र मंजुर करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासाही दिला. अशा पध्दतीचा निर्णय करणारा शिर्डी मतदार संघ हा राज्यात एकमेव ठरला आहे.

राहाता तालुक्यात मागील तीन वर्षांपासुन पर्जन्यमान चांगले असल्याने शेतकरी चांगल्या पध्दतीची पिक घेत आहेत. मात्र विजेअभावी पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे हतबल होण्याची वेळ येते. वीज पुरवठा होत असलेल्या रोहीत्रांवरही जादा भार येत असल्याने रोहीत्र बंद पडण्याच्या समस्याही वाढल्या होत्या. बंद पडलेले रोहीत्र विज वितरण कंपनीकडून वेळेत मिळत नाही. आवश्यकता असेल तिथे नवीन रोहीत्र उभे करण्यासाठीही या निधीचा विनीयोग होणार आहे.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विखे पाटील यांनी मतदार संघात उचललेले पाऊल महत्वपूर्ण ठरले असून, या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच विज टंचाईवर मात करण्याचा नवा पॅटर्न शिर्डी मतदार संघात सुरु झाल्याने विखे पाटील यांनी सुरु केलेल्या उपक्रमाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे.
(आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून रोहीत्र उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.)
