चौपदरीकरण रस्त्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार – आमदार थोरात
कारखाना ते बस स्थानक रस्त्याच्या कामाची पाहणी

प्रतिनिधी —
मागील अडीच वर्षाच्या काळात सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावासाठी व शहरासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला आहे. या निधीतून शहराच्या चारही बाजूने होणाऱ्या चौपदरीकरण रस्त्यांमुळे संगमनेर शहराचे सौंदर्य वाढणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

घुलेवाडी फाटा येथे कारखाना ते बस स्थानक या चौपदरीकरण व सुशोभीकरण कामाची पाहणी आमदार थोरात यांनी केली यावेळी समवेत अजय फटांगरे नवनाथ अरगडे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, कार्यकारी अभियंता आर आर पाटील, उप अभियंता सौरभ पाटील आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहराच्या चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांच्या चौपदरीकरण व सुशोभीकरण कामासाठी मोठा निधी मिळवला आहे. इंजीनियरिंग कॉलेज ते बस स्थानक यादरम्यान होणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने सुरू असून रस्त्याच्या मधोमध डिव्हायडरसह वृक्षारोपण व विद्युतीकरण केले जात आहे.

या रस्त्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असल्याने रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गही होणार आहे. संगमनेर शहरात हायटेक बस स्थानकासह, वैभवशाली अद्यावत इमारती उभ्या राहिल्या आहेत. शहरातील स्वच्छता, दर्जेदार विकास कामे, सांस्कृतिक वातावरण, सामाजिक सलोखा, समृद्ध बाजारपेठ, शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण यामुळे संगमनेर शहराचा लौकिक हा राज्यभर निर्माण झाला आहे.

तालुक्यातील रस्त्यांचे जाळे भक्कम करण्यासाठी निधी मिळवला असून गावोगावी रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच शहराच्या चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे काम अत्यंत वेगाने सुरू असून या रस्त्यांमुळे शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला असून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्ता पूर्व व्हावी असेही ते म्हणाले यावेळी या कामाच्या पाहणी समवेत अधिकाऱ्यांना काही सूचनाही त्यांनी केल्या.
