उच्चस्तरीय कालवे सर्वेक्षण कार्यशाळा अकोले येथे संपन्न
प्रतिनिधी —
निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यांचे लाभक्षेत्र विस्तारून अकोले तालुक्यातील वंचित गावांना शेतीसाठी पाणी द्यावे यासाठी अधिकृत सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी आवश्यक परवानग्या व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सर्वेक्षण एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन निविदा काढून निश्चित करण्यात आलेल्या एजन्सीने अकोले तालुक्यात सर्वेक्षणाचे प्रार्थमिक काम सुरू केले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन विस्ताराबद्दलच्या अपेक्षा व प्रत्यक्ष सर्वेक्षण यात समन्वय राहावा यासाठी निळवंडे पाणी हक्क कृती समितीच्या वतीने लाभ क्षेत्रातील गावनिहाय कार्यकर्ते व सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत सर्व नेते यांची सर्वेक्षण एजन्सी व जलसंपदाच्या अधिकारी यांच्यासमवेत कार्यशाळा घेण्यात आली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यशाळेमध्ये अंबड, धुमाळवाडी, नवलेवाडी, धामणगाव आवारी, परखतपूर, वाशेरे, तांभोळ, गर्दनी, टाकळी, ढोकरी, आगार, अंबिकानगर व परिसरातील निळवंडे पाणी हक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.
जलसंपदाचे अधिकारी जी. व्ही. मगदूम व सर्वेक्षण एजन्सीचे प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी कार्यशाळेमध्ये सर्वेक्षणाबाबत प्राथमिक माहिती दिली. विविध गावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावांमध्ये सिंचन विस्ताराबाबत काय अपेक्षा आहेत यांची मांडणी केली व याबाबतचे प्रस्ताव सर्वेक्षण एजन्सी व जलसंपदा विभागाला लेखी स्वरुपात सादर केले.

सर्वेक्षणासाठी अधिकारी जेव्हा गावात येतील तेव्हा लोकांच्या अपेक्षा व येथील भौगोलिक परिस्थिती याचे प्रतिबिंब सर्वेक्षणामध्ये उमटून सर्वेक्षण अधिक अचूक व्हावे यासाठी प्रत्येक गावातून प्रमुख कार्यकर्त्यांचे संपर्क सर्वेक्षण एजन्सीला यावेळी देण्यात आले. पुढील आठ दिवसांमध्ये प्रत्यक्ष गावोगाव जाऊन याबाबतचे सर्वेक्षण सुरू होणार आहे. निळवंडे उच्चस्तरीय कालवा पाणी हक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते सर्वेक्षण योग्य प्रकारे व्हावे यासाठी जातीने लक्ष घालणार आहेत. सर्व्हेक्षणाच्या सुरुवातीलाच घेण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी डॉ. अजित नवले, बाळासाहेब भोर, सुरेश खांडगे, आप्पासाहेब आवारी, महेशराव नवले, सुरेश नवले, खंडूबाबा वाकचौरे, रमेश आवारी, गणेश पापळ, रमेश शिरकांडे, किरण गजे, सदाशिव साबळे, माधव भोर, बाळासाहेब आवारी, मंगेश कराळे, भाऊसाहेब माने, प्रकाश माने, विलास भांगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
