संगमनेरचे सुसंस्कृत राजकारण राज्याला दिशादर्शक —
महसूल मंत्री थोरात
विरोधकांनी चुकीचे वागू नये. विनाकारण मनभेद करून चांगले वातावरण बिघडवू नये : संगमनेरच्या विरोधकांना कानपिचक्या
एसटीपी प्लांट बाबत गैरसमज पसरवणाऱ्यांकडे जनतेने लक्ष देऊ नये — दुर्गाताई तांबे

संगमनेर शहर व तालुका म्हणजे विकासकामांचा आदर्श
गंगामाई घाट सुशोभीकरणाचे भूमिपूजन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
प्रतिनिधी —
निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हे आपले स्वप्न आहे. मिळालेल्या संधीचा पूर्णपणे उपयोग धरणाच्या कामासाठी व कालव्यांसाठी केला आहे. निळवंडे मुळेच शहराला गोड पाणी मिळत आहे. संगमनेर मध्ये सातत्याने विकास कामे होत असून येथील चांगले राजकारण व चांगले वातावरण राज्याला दिशादर्शक आहे. विकासकामांमुळे संगमनेर हे आदर्श शहर व आदर्श तालुका होत असल्याचे गौरवोद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने गंगामाई घाटाचे सुशोभीकरण व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा नामदार थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रंगारगल्ली येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, अमित पंडित, प्रकाश कलंत्री, नितीन अभंग, हिरालाल पगडाल कैलास सोमानी, राजेश वाकचौरे, बाळासाहेब पवार, गजेंद्र अभंग, धनंजय डाके, वृषाली भडांगे, सुनंदा दिघे, निर्मला गुंजाळ, ओंकार भंडारी, किशोर टोकसे, कैलास लोणारी, आप्पासाहेब पवार, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, प्रांतअधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, मुख्याधिकारी राहुल वाघ, तहसीलदार अमोल निकम, राजेंद्र गुंजाळ, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे, निखील पापडेजा, अफजल शेख, शकील पेंटर, जावेद शेख ,गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, नवनाथ अरगडे, यांसह आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, १९९१ पासून नगरपालिकेच्या कामांना खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. डॉ. तांबे यांनी घालून दिलेल्या आदर्शावर नगरपालिकेचे कामकाज सुरू आहे. शहराला स्वच्छ व मुबलक पाणी निळवंडे धरणामुळे मिळत आहे. जनतेने केलेल्या प्रेमामुळे व नेतृत्वाच्या विश्वासामुळे राज्यात मोठी संधी मिळत गेली आणि या संधीचा पूर्ण उपयोग निळवंडे धरण, कालवे व संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी केला.

घर जसे सुंदर असावे तसे आपले शहर सुंदर असावे यासाठी मोठा निधी मिळवला आहे. शहराच्या चारही बाजूच्या मुख्य रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. सुसंस्कृत राजकारण ही परंपरा आपण कायम जपली आहे. निवडणूक झाली की कधीही राजकारण केले नाही. विरोधकांचाही सन्मान केला आहे. मात्र विरोधकांनीही चुकीचे वागू नये. विनाकारण मनभेद करून चांगले वातावरण बिघडवू नये. चांगले आहे त्याला चांगले म्हटलेच पाहिजे.

राज्यात कुठेही जा संगमनेर तालुका सहकार, शिक्षण, आर्थिक समृद्धी, शेती, चांगले वातावरण यामध्ये कुठेही कमी नाही. राज्यातील अग्रमानांकित असलेल्या पहिल्या एक- दोन तालुक्यांमध्ये या तालुक्याचा समावेश होतो आहे. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. येणाऱ्या काळामध्ये विकासातून आणखी मोठे बदल होणार असून समृद्धीत वाढ होणार असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हा विकासाचा ब्रॅण्ड झाला आहे. ना. थोरात यांनी कधीही कुणाही बाबत भेदभाव केला नाही. सर्वांना सन्मानाची वागणूक दिली. रात्रंदिवस काम करून हा तालुका विकसित केला आहे. गंगामाई घाटाच्या सुशोभीकरणात अनेक नवीन कामे होणार असून स्विमिंग पूल सह आगामी काळात कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त होणार आहे. संगमनेर हे शिक्षणाचे व विकासाचे केंद्र झाले आहे. विरोधकांनी विकासावर चर्चा करावी मात्र काही लोक धार्मिकतेचा नावावर शहरात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या की, संगमनेरात लहान मोठे गार्डन, स्वच्छ मुबलक पाण्याची व्यवस्था, सुंदर रस्ते, वैभवशाली इमारत अशी अनेक कामे उभी राहिली आहेत. कोरोना संकटामध्ये अमरधाम चे सुशोभीकरणाचे काम तातडीने केले याबाबत काहींनी खोटेनाटे आरोप केले. काम करणाऱ्यावर असे आरोप करणे हे अत्यंत चुकीचे आहे. हे जनहिताचे काम करताना कोणाचा वाईट हेतू नाही. हे त्यांनी लक्षात घ्यावे. यंग नॅशनल ग्राउंडला धक्का न लावता एसटीपी प्लांट तेथे होणार आहे. त्यामुळे याबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये असे त्या म्हणाल्या.

तर राजेश मालपाणी म्हणाले की, आर्थिक समृद्धी, सहकार, शिस्त आणि विकास ही चतुःसूत्री संगमनेरात असून संगमनेर हे राज्याच्या नकाशावर उठून दिसते आहे. विश्वास मुर्तडक म्हणाले की, जनतेला संकटात कोणतीही मदत न करणाऱ्या लोकांनी अमरधाम च्या बाबत अत्यंत चुकीचे आरोप केले त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. आबासाहेब थोरात म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहराची व तालुक्याची अत्यंत चांगली वाटचाल सुरू आहे. यावेळी हिरालाल पगडाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आभार मानले. अत्यंत उत्साहपूर्ण झालेल्या या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातून नागरिक युवक महिलांची मोठी उपस्थिती होती.
सोमेश्वर मंदिरा समोर झालेल्या शक्ती सभेसाठी शहरातील नागरिकांची मोठी गर्दी होती . अतिशय आनंदाने व उत्साहाने प्रभाग क्रमांक १ ते १४ मध्ये विविध रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण, ट्रीमिक्स काँक्रिटीकरण यासह अनेक विकास कामांचे लोकार्पण झाले व संगमनेर शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या गंगामाई घाट परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन नामदार थोरात यांच्या हस्ते झाले.
