नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचे विरोधक डॉ. अनिल काकोडकर यांना समितीतून हटवा ….

अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर नाशिक–पुणे रेल्वे कृती समितीने डॉ. अनिल काकोडकर यांना अभ्यास समितीतून हटविण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

कृती समितीच्या निवेदनानुसार, २४ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या आड येणारा जीएमआरटी (GMRT) प्रकल्प अन्यत्र हलविण्याची विनंती केली होती. त्यावेळी डॉ. अनिल काकोडकर यांनी खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाची जोरदार पाठराखण केली होती. जीएमआरटी ही संस्था अत्यंत महत्त्वाची असून विकास प्रकल्प पर्यायी मार्गाने पूर्ण करता येतील, मात्र जीएमआरटीला कोणत्याही परिस्थितीत धोका होता कामा नये, असे त्यांचे मत असल्याचा दावा समितीने केला आहे.

याच भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा डॉ. काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याबद्दल कृती समितीने प्रश्न उपस्थित केला आहे. अशा समितीकडून वेगळ्या निष्कर्षाची अपेक्षा कशी करता येईल, असा सवालही समितीने केला आहे.

कृती समितीच्या मते, सरकारने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समिती नेमून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनतेने आंदोलनात कोणतीही शिथिलता आणू नये आणि रेल्वे मार्ग अंतिमतः मंजूर होईपर्यंत एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

समितीने पुढे म्हटले आहे की, अनेक वर्षांनंतर एखाद्या विकास प्रकल्पासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहत आहे. अशा वेळी जनतेने सावध राहणे आवश्यक असून, अन्यथा भविष्यात जीएमआरटीच्या कारणास्तव विविध विकास प्रकल्पांनाही अडथळे निर्माण होऊ शकतात.

९ ऑगस्ट रोजी होणारे ‘चक्काजाम’ आंदोलन हे केवळ सुरुवात असल्याचे सांगत, “चक्काजाम होणारच, रद्द केलेली रेल्वे पुन्हा आणणारच,” असा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नाशिक–पुणे रेल्वे कृती समिती, संगमनेरचे समन्वयक सतीश खताळ, रवींद्र हासे, प्रवीण हासे, रामेश्वर पानसरे, प्रितम साबळे, अजय हासे, शिवाजी जगताप, विजय उदावंत, अमोल शेलकर, शिवाजी गुंजाळ, निलेश गुंजाळ, प्रकाश कडलग, ॲड. समीर लामखडे, राहुल गायकर, मोहसीन शेख, अनिल गुंजाळ, संदीप काकड, डॉ. सचिन वाळे, ॲड. अनिल गोडसे, राम अरगडे, अरुण चव्हाण, ओंकार बिडवे, सत्यजित थोरात, प्रदीप हासे आणि प्रवीण काकड यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!