काकोडकर समितीचा अहवाल प्रतिकूल आल्यास रस्त्यावर उतरणार, उपोषण करणार – आमदार अमोल खताळ
‘चक्काजाम’ सर्वपक्षीय नव्हे, एका कुटुंबापुरते मर्यादित असल्याचा आरोप…
संगमनेर / प्रतिनिधी :
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मागणीसाठी प्रस्तावित करण्यात आलेले ‘चक्काजाम’ आंदोलन सर्वपक्षीय असल्याचा दावा केला जात असला, तरी या आंदोलनाबाबत आपल्याला कोणाचाही फोन अथवा निरोप आलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन सर्वपक्षीय नसून एका कुटुंबापुरते आणि राजकीय कुरघोडीपुरते मर्यादित असल्याची टीका आमदार अमोल खताळ यांनी केली.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प संगमनेर आणि परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, हा प्रकल्प झाला पाहिजे, ही आपली भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दानुसार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल लवकरच समोर येणार असल्याने त्यापूर्वी आंदोलन करून जनतेला वेठीस धरण्यापेक्षा समितीचा निष्कर्ष जाणून घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिकूल अहवाल आल्यास सर्वप्रथम मीच रस्त्यावर उतरेन
आमदार खताळ म्हणाले, “काकोडकर समितीचा अहवाल काय येतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अहवाल सकारात्मक आला तर आपण त्याचे स्वागत करू. मात्र, अहवाल प्रतिकूल आला आणि संगमनेरच्या हक्काच्या मार्गाला नकार दिला गेला, तर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम मीच रस्त्यावर उतरेन. जनतेच्या हक्कासाठी वेळप्रसंगी उपोषण करण्याची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही.”
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन हे जनतेच्या प्रश्नासाठी असावे, राजकीय श्रेयासाठी नव्हे. जनतेला वेठीस धरून किंवा वाहतूक व्यवस्था विस्कळीत करून राजकीय कुरघोडी साधणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

“पुणे-नाशिक रेल्वे हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा विषय नसून संगमनेर, अहिल्यानगर, पुणे आणि नाशिकच्या भवितव्याशी जोडलेला विकासाचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नावर प्रामाणिकपणा, सर्वसमावेशकता आणि एकजूट अपेक्षित आहे,” असे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या प्रश्नावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या समवेत नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आपण या प्रकल्पासाठी ठोस पाठपुरावा केल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी आग्रह धरल्याचे सांगितले. केंद्र सरकारही या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे खताळ यांनी नमूद केले.

संगमनेरच्या विकासासाठी रेल्वे महत्त्वाची
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमुळे संगमनेरला पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांशी जलद रेल्वे जोडणी मिळणार असून उद्योग, व्यापार, शिक्षण, रोजगार आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे हा प्रकल्प संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
“काकोडकर समितीचा अहवाल या प्रकल्पाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अहवाल सकारात्मक आला तर त्याचे स्वागत करू; मात्र प्रतिकूल अहवाल आल्यास कोणत्याही दबावाला न जुमानता जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची माझी भूमिका स्पष्ट आहे. संगमनेरच्या विकासाच्या प्रश्नावर मी कोणतीही तडजोड करणार नाही,” असा ठाम निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
