न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल होऊनही डॉक्टर संघटनेचा पोलीस, प्रशासन आणि मीडियावर दबाव आणण्याचा प्रयत्न….

डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटल प्रकरण 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरातील डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटल मधील डॉक्टर अभिजीत कोरडे आणि डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर या दोन डॉक्टरवर हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार असा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आलेला आहे. असे असतानाही संगमनेर येथील डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), यांनी सोशल मीडियातून व्हिडिओ व्हायरल करून आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना फायदा होईल असे विविध आरोप केले आहेत. हा एक प्रकारे न्यायालयावर अविश्वास दाखवण्याचा प्रकार असून पोलीस प्रशासन आणि मीडियावर दबाव आणण्याचा देखील प्रकार आहे.

अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी यांच्यावर डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. या उपचारानंतर रुग्णास नाशिक येथे हलवण्यात आले. त्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. या संदर्भात संगमनेर न्यायालयाने आदेश दिल्याने दोन्ही डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेबाबत देखील साशंकता व्यक्त होत आहे. फिर्यादीने पोलिसांकडे सुमारे चार महिने हेलपाटे मारूनही गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता. शेवटी फिर्यादीला न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतरही आठ दिवस विलंबाने हा गुन्हा दाखल करण्यात आला.. एकंदरीत कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारण या संपूर्ण प्रकारणात पोलिसांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

पूर्ण प्रकरणाच्या बातम्या सोशल मीडिया वरून, वृत्तपत्रांमधून आणि वृत्तवाहिन्यांमधून प्रसारित झाल्या. याचा राग आल्याने संगमनेर येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) संगमनेर शाखा या संघटनेने शहरातील त्यांचे सर्व सदस्य गोळा करून पोलीस स्टेशन आणि प्रशासनामध्ये निवेदन देऊन आरोपींची मीडिया ट्रायल चालू असल्याचे आणि बदनामी चालू असल्याचे आरोप केले आहेत. हा एक प्रकारे पोलीस प्रशासन आणि मीडियावर दबाव आणण्याचा प्रकार आहे.

संगमनेरच नव्हे तर इतर तालुक्यातीलही डॉक्टरांची संघटना ॲक्टिव्ह करून अशा प्रकारचे पोलीस प्रशासनांना निवेदन देणे म्हणजे संघटितपणे दबाव आणण्याचा हा प्रकारच असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाने आदेश देऊन गुन्हा दाखल झाला असला तरी डॉक्टर संघटनेला सदर बाबतीत आरोपी डॉक्टरची बदनामी होत असल्याचे वाटते. खोटी माहिती प्रसारित केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा एक प्रकारे न्यायालयाचाही अवमान असल्याचेच प्रथमदर्शनी दिसते. एकंदरीत पाहता संघटितपणे पोलीस प्रशासन आणि मीडियावर दबाव आणण्याचा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेर यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच त्यांनी डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटलने नगरपालिकेच्या जागेत केलेले अतिक्रमण काढून टाकण्याची आग्रही मागणी केली होती. आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यांच्या मागणीवरून पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करीत डॉक्टर सोनांबेकर हॉस्पिटलचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने भुईसपाट करून टाकले. अतिक्रमण करणे कोणत्या कायद्यात बसते ? हे सभ्यतेचे आणि नैतिकतेचे कोणते लक्षण आहे ? संगमनेर शहरात केलेल्या अशा अतिक्रमणांचा शोध घेतला तर अनेकांचे बुरखे फाटतील. शिवसेनेने हे सामाजिक काम हाती घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

याच हॉस्पिटलच्या विरोधात आणखी एक तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. डॉक्टरांची संघटना व पदाधिकारी रुग्णांच्या हितासाठी कधीही जनतेपुढे आले नसल्याचे बोलले जाते. परंतु या प्रकरणामध्ये त्यांनी संघटना सहभागी करून प्रसारमाध्यमांनी बातम्या देऊ नये म्हणून एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर करण्याचे ठरविलेले दिसते. मेडिकल कौन्सिल ॲक्ट आणि बॉम्बे (महाराष्ट्र) नर्सिंग होम ॲक्ट, नगरपालिका ॲक्ट चे उल्लंघन करून वैद्यकीय क्षेत्रात जो काळाबाजार चालू आहे, तो दाबण्याचा हा प्रकार असल्याची समाजात चर्चा आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!