पेडगाव किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा 

वास्तुविशारद काजल दरेकर-जंजिरे यांचे आवाहन

अहिल्यानगर प्रतिनिधी – 

श्रीगोंदे तालुक्यातील पेडगावचा धर्मवीर गड हा किल्ला भावी पिढ्यांसाठी इतिहासाची साक्ष व प्रेरणा देणारा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे किल्ल्याची दुरुस्ती, सुशोभिकरण व संवर्धनासाठी पेडगाव ग्रामस्थांनी पुढाकार घेवून राजकीय व शासकीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वास्तुविशारद काजल दरेकर-जंजिरे यांनी केले. 

काजल दरेकर-जंजिरे या पेडगावचे सुपूत्र व सहायक पोलीस आयुक्त महेश ईश्वर जंजिरे यांच्या पत्नी आहेत. त्या पुण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद असून, लॅंडस्केप हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. आपल्या पेडगाव या गावातील साडेतीनशे वर्षांचा ऐतिहासिक साक्षीदार असलेल्या धर्मवीर गडासंदर्भात ( पेडगाव किल्ला) काजल यांनी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पेडगाव किल्ल्याबाबत शोधनिबंध मांडीत सविस्तर सादरीकरण केले. त्यामुळे अगोदरच प्रसिद्ध असलेला हा किल्ला आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला जावू लागला आहे. 

या कामगिरीबद्दल पेडगाव ग्रामस्थांनी काजल दरेकर-जंजिरे यांचा भैरवनाथ मंदिराच्या पटांगणात सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना काजल बोलत होत्या. पेडगावचे सरपंच इरफान पिरजादे व माजी उपसरपंच अशोक गोधडे यांच्या हस्ते काजल दरेकर-जंजिरे यांना फेटा बांधून आणि शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात आले. ज्येष्ठ नेते हरिदास शिर्के, पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश झिटे, माजी सरपंच रोहिदास पवार, माजी सरपंच बबनराव कणसे, प्रतिभाताई झिटे, बांधकाम व्यावसायिक ईश्वर जंजिरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जंजिरे, महिला बचत गटाच्या नेत्या सुनीता जंजिरे यांच्यासह महिला, युवक, विद्यार्थीनी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काजल यांनी यावेळी किल्ल्यासंदर्भातील शोधनिबंध व सादरीकरणात मांडलेल्या विविध बाबींचा उहापोह करीत अनेक गावक-यांनाही माहिती नसलेले पैलू ग्रामस्थांसमोर उलगडविले. 

काजल यांच्या या सादरीकरणामुळे किल्ल्याची महती व माहिती जगभर पोचली आहे. जंजिरे कुटुंबाप्रमाणेच गावाची सेवा करण्याची काजल यांची उपजत वृत्ती दिसून येते. त्यामुळेच काजल व त्यांचे पती सहायक पोलीस आयुक्त महेश जंजिरे ग्रामस्थांच्या कौतुकास पात्र आहेत. त्या पार्श्वभूमीवर काजल यांचा आज गावकरी गौरव करीत असल्याचे गौरवोद्गार सरपंच इरफान पिरजादे यांनी यावेळी काढले. काजल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थ संघटितपणे पेडगाव किल्ल्याची दुरुस्ती, सुशोभीकरण व जतन करण्यासाठी विशेष पुढाकार घेतील, असेही पिरजादे यांनी स्पष्ट केले. गावाप्रती असलेल्या प्रेम भावनेतून काजल यांनी केलेल्या दमदार सादरीकरणाबद्दल वयोवृद्ध मंडळींसह महिला, युवक व विद्यार्थ्यांनी काजल यांचे समक्ष भेटून कौतुक केले. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!