संगमनेरमध्ये गोवंश कत्तली तर होणारच !
पोलीस – राजकीय नेते – कसाई सगळ्यांनाच हवा आहे मलिदा…
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरात आणि तालुक्यात गोवंश जनावरांच्या कत्तली, गोवंश मांस, जनावरांची वाहतूक आदी सर्व प्रकार अगदी धूमधडाक्यात सुरू आहेत. पोलीस – राजकीय नेते – कसाई यांच्या सर्वांच्या मिलीभगत मुळे गोवंश कत्तली तर होणारच… असा सूर पाहण्यास मिळतो. आमदार अमोल खताळ यांचा कितीही विरोध असला तरी कत्तली थांबणार नाहीत. कत्तलखान्याच्या नावाने गळे काढणाऱ्या तथाकथित संघटना, आंदोलक, गोवंश रक्षक आता चिडीचूप बसलेले दिसतात. एकंदरीत या कत्तलीतून मिळणारा मलिदा खाण्यावर सगळ्यांचा जोर दिसत आहे.

कत्तली आवडे सर्वांना
गोवंश कत्तली, तस्करी यातून मिळणारा अफाट पैसा, त्यातून मिळणारे हप्ते आणि वाटला जाणारा मलिदा हा सगळ्यांनाच आवडीचा झाला आहे. प्रशासन, पोलीस, राजकीय नेते, संघटना, राजकीय पक्ष, पत्रकार अनेक जण मलीद्याचा प्रसाद मिळवत असल्याचे बोलले जात आहे.
अवैध गोवंश कत्तलखाने आणि गोहत्यांच्या बाबतीत हाताच्या बोटावर मोजण्याइतके चार दोन पत्रकार सोडले तर कोणीही आवाज उठवताना दिसत नाही. तेच चार-पाच लढाऊ पत्रकार अवैध कत्तलखान्यांच्या विरोधात पोलिसांशी, राजकीय नेत्यांशी, कसायांशी वैर घेऊन सातत्याने आपल्या लेखणीतून आवाज उठवत असतात.
एकीकडे एका बड्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या संघटना आंदोलन करतात, दुसरीकडे त्याच पक्षाचे नेते छुप्या पद्धतीने कत्तल करणाऱ्यांना सपोर्ट करतात. आंदोलने अचानक बंद होतात आणि अशा सगळ्यांची एकमेकाची मैत्री असल्याचे फोटो देखील व्हायरल होतात. कत्तलखान्याशी संबंधित मंडळी सुद्धा राजकीय प्रोग्राम बरोबर दिसते. हा सर्वच प्रकार मलीद्याच्या अवतीभवती फिरत असल्यामुळेच दिसून येतो. त्यामुळे कत्तलखाने सर्वांच्याच आवडीचे झाले असल्याचे दिसते.

शहर पोलीस अधून मधून चमकतात
कत्तलखान्यावर सातत्याने कारवाई करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेहमीच आघाडीवर दिसून आले आहे. अनेक वेळा त्यांनी छापेमारी करून गुन्हे दाखल केले आहेत. मात्र ज्यांची जबाबदारी आहे असे संगमनेर शहर पोलीस अशा कारवाईत अधून मधून चमकत असतात. शहर पोलिसांच्या डीबी पथकातील मंडळी आणि मलिदा याचा बराच संबंध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहर पोलिसांना कत्तलखान्यात काय चालू आहे हे माहीत नाही असे कदापिही होणे शक्य नाही. एलसीबी चे पथक नगरहून येऊन छापा टाकते याचा अर्थ शहर पोलिसांनी झोपेचे सोंग घेतले असल्या सारखाच होतो.

ग्रामीण पोलीसही सहभागी
संगमनेर तालुक्याच्या हद्दीत देखील गोवंश कत्तली, गोमांस वाहतूक, जनावरांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. तालुका पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या विविध गुन्ह्यातून ही माहिती समोर येईल. अगदी टनांच्या वजनात गोवंश मांस सापडलेले आहे. संगमनेर शहरातून जाणारे गोमांस रात्रीच्या वेळी तालुक्याच्या हद्दीतून सुखरूप बाहेर काढून देण्यासाठी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांकडून सुपारी घेतली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संगमनेर उपविभागातील आणि विशेषतः संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्याच्या भोवती गोवंश कत्तली, जनावरांची वाहतूक व मांस वाहतूक याबाबत संशयाचे वातावरण आहे.
