संगमनेर शहरातील मटका व जुगार अड्डे बंद न केल्यास आंदोलन  !

शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांचा इशारा

प्रतिनिधी —

संगमनेर शहरात मोठ्या धुमधडाक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांपैकी शहराची बदनामी करणारे मटका आणि जुगार अड्ड्यांनी गणेश उत्सवाच्या काळात धुमाकूळ घालता असल्याचे चित्र आहे. शहरातील या अवैध धंद्यांबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. शहरातील मटका किंग वर कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नाही. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस उपअधीक्षकांनी 62 व्यक्तींना शहरात येण्यास बंदी घातली आहे. मात्र यातून अनेक गुन्हे दाखल असलेले मटका किंग आणि जुगार अड्ड्याचे चालक-मालक आश्चर्यकार्यकरित्या वगळण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत हे सर्व धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली असून हे धंदे बंद झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू आहे शहरातील 50 पेक्षा जास्त ठिकाणी मटका पेढ्या सुरू आहेत. या मटका अड्ड्यांमुळे अनेक वेळा शहरातील शांतता व कायदा व्यवस्था बिघडलेली असून दंगलीही घडल्या आहेत. तसेच जुगाराचे क्लबही राजरोसपणे सुरू आहेत.

गणेशोत्सवानंतर दसरा दिवाळी व निवडणुकीचे वातावरण आहे. या गोष्टीचा फायदा घेत संगमनेर मध्ये दंगल घडवून संगमनेरचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अवैध व्यावसायिक करत असतात. यापूर्वीही शहराला अस्थिर करण्याचे अनेक उद्योग या मंडळींनी केले असल्याचे पोलिसांच्या गुप्त तपासात उघड झाले असल्याचे बोलले जाते.

युवा पिढी या अवैध धंद्यांमुळे देशोधडीला लागलेली आहे.  शहराच्या महत्त्वाच्या उपनगरांसह मध्यवर्ती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अवैध मटका व्यवसाय, ऑनलाइन जुगार गेम चालत आहेत. या ठिकाणी अनेक वेळा वाद उद्भवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व मुस्लिम समाजाची प्रार्थना स्थळ, मशीद शेजारी असताना देखील अवैध मटका व्यवसायासह ऑनलाइन जुगार व्यवसाय त्या ठिकाणी चालतो.

या धंद्यांमुळे हिंदू मुस्लिम वाद देखील झालेले आहेत. तरी आपण संगमनेर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचा सहानुभूती पूर्वक विचार करून संगमनेरची शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवावी ही अपेक्षा, तसेच संगमनेर मध्ये सुरू असलेला ऑनलाइन गेम, बिंगो, लोटो सह मटका त्वरित बंद करावा अन्यथा गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कोणत्याही क्षणी उपोषण आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, मोर्चा व इतर प्रकारचे आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपली राहील याची दक्षता घ्यावी. असा इशारा संगमनेर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी व शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आलेला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!