अनुसूचित क्षेत्रातील पेसा गावांची ऐतिहासिक संयुक्त ग्रामसभा !
प्रतिनिधी —
अनुसूचित क्षेत्रातील संयुक्त आदिवासी पेसा ग्रामसभा देवगाव (ता.अकोले जि.नगर) येथे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, पेसा अध्यक्ष तसेच काही सामाजिक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासींच्या १७ संवर्गातील पेसा पद भरतीत राज्य शासनाने घेतलेल्या विरोधी भुमिकेबाबत ही ग्रामसभा प्रामुख्याने घेण्यात आली.

संयुक्त ग्रामसभेत दोन महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. पेसा १७ संवर्गातील पदांच्या भरती विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणारी संबंधीत संस्था व राज्य सरकारकडुन ज्या पद्धतीने आदिवासी च्या संविधानिक अधिकाराचं व पेसा कायद्यांचं उल्लंघन करण्यात आला आहे. त्याचा निषेध करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

अनुसूचित क्षेत्रातील वन हक्क समित्यांचे अतिक्रमण ग्रामसभेला मान्य नाही. वन संवर्धन व संरक्षण अधिनियम २०२३ हा कायदा केंद्र सरकारने आणुन पुन्हा आदिवासी समाजाच्या संविधानिक अधिकारांच म्हणजेच ग्रामसभेचे अधिकार कमी केले आहेत. हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा असा दुसरा ठराव करण्यात आला.
ही ग्रामसभा अकोले तालुक्यातील ऐतिहासिक सभा ठरली आणि पुन्हा एकदा शेणित येथिल जंगल सत्याग्रहाची आठवण झाली. १९३० रोजी याच परिसरात आदिवासींनी सात हजारांची बैठक घेतली होती व जंगल बचाव आंदोलन चालवले होते.

यावेळी जहागिरदारवाडी चे सरपंच पंढरीनाथ खाडे, कृती समितीचे सदस्य रोहिदास जंगले, पेसा अभ्यासक प्रा.धोंगडे, संयुक्त ग्रामसभेचे अध्यक्ष तुळसाबाई भांगरे, सरपंच देवगाव, वैशाली खाडे सरपंच बारी, कविता मधे सरपंच चिंचोडी, सुलोचना संतु जाधव सरपंच कोकणवाडी, अनिता विनायक खाडे, सरपंच भंडारदरा, उषा प्रकाश धांडे सरपंच आंबेवंगण, धनश्री संदिप झडे सरपंच रतनवाडी, पंढरीनाथ निवृत्ती भवारी सरपंच शेलविहीरे, भगवान लहु खोकले सरपंच पाचपट्टा, एकनाथ पुनाजी सारोक्ते सरपंच कोलटेंभे, भागवत गंगाराम गातवे सरपंच पेढेवाडी, भास्कर नाथु बादड सरपंच पाचनई, विठ्ठल पुनाजी गोडे सरपंच तिरडे, योगेश भागा भांगरे सरपंच एकदरे, एकनाथ बांडे सरपंच साम्रद, मदन निवृत्ती मेंगाळ सरपंच म्हाळुंगी, पेसा संघटनेचे सर्व सरपंच उपस्थित होते.
