संगमनेर – अकोले महसूल घोटाळा !
संगमनेर बस स्थानक घोटाळ्याचा पाठीराखा कोण ?
आर्थिक गुन्हे शाखा किंवा ईडीने चौकशी करण्यासाठी तक्रार
प्रवरा – म्हाळुंगी नद्यांच्या संगमावर एक कोटी रुपयांचा बेकायदेशीर शांतीघाट !
नगरपालिकेचे उद्योगही चव्हाट्यावर…
भाग ४
विशेष प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक अवैध, विनापरवाना, नियमबाह्य, बेकायदेशीर कामांच्या, जमिनी खरेदी विक्री व्यवहाराच्या, जमिनीच्या संशयास्पद अदलाबदली, गौण खनिज तस्करी अशा सुमारे 40 पेक्षा जास्त तक्रारी करण्यात आलेल्या असून देखील त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासह महसूल विभागाच्या संबंधित कार्यालयांकडून अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नसल्याचे चित्र समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने आता संगमनेर नगर परिषदेच्या आदेश झालेले बेकायदेशीर बांधकामांचे उद्योग आणि बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या संगमनेरच्या भव्य बस स्थानकाच्या कामात झालेला करोडो रुपयांचा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे.

संगमनेर शहर आणि तालुक्यात महसूल विभागाला हाताशी धरून विविध प्रकारचे भ्रष्टाचार आणि कायद्याची पायमल्ली करत अधिकाऱ्यांवर दबाव आणून केलेल्या विविध बेकायदेशीर प्रकरणांच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. बऱ्याच तक्रारी असल्या तरी त्यातील काही तक्रारींची प्रकरणे उघड झाली आहेत. याचा गाजावाजा होऊ नये यासाठी विविध प्रकारे दबाव आणला जात आहे. आपले पितळ उघडे पडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये अधिकारी, राजकीय पुढारी, माजी अधिकारी, नातेवाईक सगे सोयरे, भाऊबंद यांचा देखील सहभाग आहे.

बसस्थानक म्हणजे दिखाऊपणाच्या आडचा ब्रह्म घोटाळा !
गेल्या काही वर्षांपासून संगमनेर शहरामध्ये बांधण्यात आलेले बीओटी तत्त्वावरचे भव्य बस स्थानक विविध घोटाळ्यांनी आणि नियमबाह्य कामांनी चर्चेत आले आहे. या बस स्थानकाच्या बाबत अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. सातत्याने हे बस स्थानक शंका कुशंकांच्या कचाट्यात सापडलेले आहे. बस स्थानकाचे काम करणारे विकासक यांच्यावर थेट आरोप करण्यात आले असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बस स्थानकाचे बांधकाम करताना आणि व्यापारी संकुल प्रकरणी विकासक यांनी गाळे करारनामे करताना गाळेधारकांकडून लाखो रुपये घेतल्याप्रकरणी त्यांची ही चौकशी आर्थिक गुन्हे शाखा किंवा ईडी कडून करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. याच बस स्थानकासाठी विकासकाने नगर रचना विभागाचा नकाशा डावलून कुठलीही परवानगी न घेता व्यापारी संकुलाच्या गाळ्यांमध्ये अंतर्गत आणि बाहेरील बदल केल्या मुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

पालिकेच्या शांती घाटाची जलसमाधी !
त्याचबरोबर नगरपालिकेच्या हद्दीत पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कामांच्या बाबतीत देखील तक्रारी करण्यात आल्या आहेत. नगरपालिकेने नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले असल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आलेला आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शहर हद्दीतील प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर बांधण्यात आलेला शांतीघाट हा पूर्णपणे बेकायदेशीर असून नियमांचे आणि कायद्याचे थेट उल्लंघन करण्यात आलेले आहे. यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. हे पैसे जवळच्या ठेकेदाराच्या घशात ओतण्यात आले आहेत. मुळात संगमावर आणि पुर नियंत्रण रेषेच्या आत असे बांधकाम करून प्रशासनानेच कायदा मोडीत काढला आहे. पावसाळ्यात नदीला पाणी वाढले की हा घाट पाण्याखाली जातो आणि नगरपालिकेच्या बेकायदेशीर कामाला काही दिवस जलसमाधी मिळते. वेळोवेळी तक्रारी करून कारवाई होत नाही. ज्या खात्याची ही जबाबदारी आहे ते जलसंधारण पाटबंधारे खाते देखील याकडे दुर्लक्ष करीत असून नद्या काठच्या अतिक्रमणांवर आणि नदीपात्रात झालेले अतिक्रमण हे या विभागाच्या आशीर्वादानेच होत आहे.

सुंदर आणि हरित शहराच्या छाताडावर उभे असलेले बंद सिग्नल !
शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी सिग्नल यंत्रणा लावण्यात आली. या सिग्नल यंत्रणेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. पेपरबाजी करण्यात आली. उदो उदो करून झाल्यानंतर ही यंत्रणा बंद पडली. ती आजही बंदच आहे. सिग्नल सुद्धा हरवले आहेत. त्यावेळी या यंत्रणेसाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च झाला असल्याचे सांगितले जात होते. मग एवढा खर्च करून ही यंत्रणा आजही बंद असूनही लोकप्रिय प्रतिनिधी आणि नगरपालिकेचे प्रशासन गप्प का असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे संगमनेर नगरपालिका हद्दीत सर्वच कामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी करत यामध्ये अत्यंत जवळचे असलेल्या नातेवाईकांची आणि कार्यकर्त्यांची, ठेकेदारांची नावे देखील देण्यात आलेली आहेत. (क्रमशः)
