दीड लाखाच्या लाच प्रकरणी नगर एलसीबीच्या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल !
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि त्या विरोधात खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केलेल्या स्थानिक गुन्हे शाखा, एलसीबीच्या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस नाईक संदीप चव्हाण असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्याची तत्कालीन नेमणूक अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली होती. चव्हाण सध्या नगरच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहे. लाच लुचपतच्या नाशिक येथील पथकाने ही कारवाई केली असून अहमदनगर लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.

लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या हॉटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी व ताब्यात घेतलेले असल्याने सोडून देण्यासाठी पोलीस नाईक संदीप चव्हाण याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री मधुकर जाधव, पोलीस हवालदार संदिप वणवे, महिला पोलीस हवालदार ज्योती शार्दुल, पोलीस नाईक परशराम जाधव यांच्या सापळ्यात ही बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे पोलीस नाईक संदीप चव्हाण याच्या विरोधात लाच लुचपतच्या पोलीस निरीक्षक मीरा कौतिका वसंतराव आदमाने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसापासून नगर एलसीबीच्या वादग्रस्त आणि भ्रष्टाचारी कारभाराविरोधात नगरचे खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केले आहे. या कारवाईमुळे लंके यांच्या उपोषणातील मागणीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
