स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) नगरच्या गैरकारभारा विरोधात खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरू !

न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार

उपोषण स्थळी नागरिकांचे अनेक आरोप

प्रतिनिधी —

 

नगर जिल्हा पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भ्रष्ट कारभारावर थेट आरोप करण्यात येऊन या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी नगर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलन स्थळी नागरिकांनी पोलिसांवर आणि स्थानिक गुन्हे शाखेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात असून चिडलेल्या नागरिकांनी हा गंभीर प्रश्न संसदेत उपस्थित करावा अशी मागणी देखील खासदार लंके यांच्याकडे केली आहे.

पाथर्डी येथील दरोड्याच्या घटनेत सोनारांना अटक करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली. कायद्याचा धाक दाखवून लोकांना फसवणारी ही स्थानिक गुन्हे शाखा गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि जनतेच्या मदतीसाठी नसून ‘दरोडेखोरांची टोळी’ आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला. एलसीबीचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांच्या विषयी विविध आरोप आणि पुरावे असून देखील त्यांना पाठीशी घातले जाते. यास पोलीस अधीक्षक जबाबदार असून त्यांना सुद्धा हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

दोन दोन गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या त्या वादग्रस्त कर्मचाऱ्यावर एवढी मेहरबानी का असा सवाल करीत शिर्डी सुरक्षा विभागात बदली असताना नियमबाह्य पद्धतीने या वादग्रस्त व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेत आणून बसवण्यात आले आहे. हा कर्मचारी त्या ठिकाणी बसून सेटलमेंट करण्याचे काम करतो. आणि पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यात मांडवली करण्याचे काम काम करीत असून पोलीस अधीक्षक कार्यालयाचा तो कलेक्टर (वसुली) असल्याचा आरोप करण्यात आला.

नगर जिल्ह्यातील कॅफे, गुटखा विक्रेते, वाळू तस्करी, भंगारवाले, मटका, जुगार, गांजा, ऑइल – डिझेल तस्करी, गोवंश हत्या, कत्तलखाने अशा विविध अवैध धंदे करणाऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांची हप्ते वसुली करण्यात येते. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात येतात. रवींद्र कर्डिले या कर्मचाऱ्याच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. कोट्यावधी रुपयाची संपत्ती त्याने जमवली असल्याचा आरोप एका व्यक्तीने केला असून या व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे त्याचे म्हणणे असून मी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

खोटे गुन्हे दाखल करणे, गुंडगिरीत झालेली वाढ यामुळे नगर जिल्ह्यात कायदा व्यवस्था नेहमीच अडचणीत आलेली असते.  निवडणुकांमध्ये देखील खोटे गुन्हे दाखल केले. माजी नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यू प्रकरणाची देखील चौकशी झाली पाहिजे. त्यांना तुरुंगात मारहाण झाली त्यात एलसीबीचे हेच वादग्रस्त कर्मचारी सहभागी होते असा आरोप करण्यात आला. पाकीट मारी, सोनसाखळीच्या चोऱ्या करणाऱ्या चोरांना थेट पकडून दिले तरी लक्ष दिले जात नाही. सातारा पोलिसांनी येथून आरोपी पकडून नेले पण नगरच्या पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. चोरांची आणि पोलिसांची मिलीभगत आहे काय असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला. नगरमध्ये पोलीस प्रशासन नेमके काय काम करतय हा एक संशोधनाचा विषय झाला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!