छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील…
शक्तिमान शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये सुरू आहेत अवैध धंदे !
शहर पोलिसांसह वरिष्ठांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी —
पोलीस उपअधीक्षक, प्रांत अधिकारी कार्यालय, संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि उत्पादन शुल्क व दारूबंदी विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांसमोरील परिसरातील शक्तिमान टॉवर्समध्ये (शॉपिंग कॉम्प्लेक्स) अवैध धंदे बोकाळले असून याकडे पोलीस यंत्रणेसह सर्वच विभागांचे दुर्लक्ष झाल्याने हॉटस्पॉट असलेल्या या परिसरात गंभीर घटना घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

अवैध व्यवसायाचे जाळे संगमनेरात मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन पुतळ्यांच्या परिसरातील अवैध धंदे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यामुळे या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे शहराच्या शांततेला गालबोट लागण्याची चिन्हे आहेत. संगमनेर शहरातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि उपक्रमांची सुरुवात ज्या राष्ट्रपुरुषांच्या, महापुरुषांच्या आशीर्वादाने सुरू होते. त्याच परिसरात असे अवैध धंदे शहराच्या प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला आव्हान देत सुरू आहेत. ही संबंधित यंत्रणेच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने देखील लाजिरवाणी बाब आहे.

सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरमधे अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्या अवकृपेने अवैध धंद्यांचा शहाराला कलंक लागला आहे. शहरात सर्वच प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या एजंट मार्फत होणाऱ्या अर्थपूर्ण नात्यामुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.
ज्यांच्यावर या अवैध धंद्याचा बीमोड करण्याची जबाबदारी आहे, त्या सर्वच यंत्रणा हप्तेखोरीत बरबटल्याने याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. परिणामी हप्तेखोरीत अडकलेले अधिकारी बदलून जातील मात्र संगमनेरकरांना याचे परिणाम भोगावे लागतील अशी स्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मारुती मंदिर, हॉस्पिटल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काही पावलांवर शंभर मीटरच्या आत असलेली शक्तिमान टॉवर्स ही इमारत अवैध धंद्यांचा हॉटस्पॉट बनली आहे. जवळच मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ देखील आहे. या ठिकाणी बिंगो गेम, लोटो गेम, ऑनलाइन लॉटरी, गांजा सिगारेट, गुटखा, मटका याबरोबरच जुगार आणि अन्य गोष्टी देखील सर्रासपणे सुरू असतात.

