मोबाईल ॲपचा वापर करीत संगमनेरात मटक्याचा धुमाकूळ !
अनेक गुन्हे दाखल होऊनही तडीपार नाही…
प्रतिनिधी —
नगर पासून संगमनेर पर्यंत पोलीस कर्मचारी, अधिकारी, पोलीस पथके यांच्या हप्ता खोरीमुळे संगमनेरातला मटका धंदा बंद केला असल्याची चर्चा शहरांमध्ये आणि तालुक्यात घडवून गुपचूप छुप्या रीतीने मटका पेढ्या चालू ठेवणाऱ्या संगमनेरच्या दोन मटका किंग वर नगरच्या एलसीबी आणि शहराच्या पोलिसांनी छापे टाकून कारवाई करण्याचा सपाटा लावला असतानाच आता मटका किंग मंडळींनी नवी शक्कल लढवून मोबाईल ॲप द्वारे हा धंदा सुरू केला आहे. या ॲप मधून त्यांना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत असल्याने पोलिसांना याची भनक देखील लागत नाही.

पोलिसांनी कारवाया सुरू केल्यानंतर शहरातले अवैध धंदे कसे चालू ठेवायचे याच्या वेगवेगळ्या आयडिया वापरून धंदे कसे चालू ठेवायचे यात पारंगत असणाऱ्या दोन नंबर धंद्यावाल्यांनी सध्या मटका बंद असल्याचे दाखवू मोबाईल ॲप द्वारे जोरात मटका धंदा सुरू केला आहे.

DBIMarket.apk या ॲपचा वापर हा धंदा करण्यासाठी जोरदारपणे सुरू असल्याची माहिती समजली आहे. आधुनिकतेचा वापर करीत मोबाईल फोनवरून आकडे घेण्याचे पद्धत तर चालूच होती. चलता फिरता मटका देखील चालू होता आता मोबाईल ॲप द्वारे मटका आकडे घेण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे.

शहरातील दिल्ली नाका, तीनबत्ती, नेहरू चौक, माळीवाडा, अकोले नाका, विविध व्यापारी संकुलांचे छुपे गाळे अशा महत्त्वाच्या ठिकाणी मटका पेढ्या सुरु आहेत. एलसीबी आणि शहर पोलीस सातत्याने कारवाया करीत असले तरी मटका किंग आणि त्यांच्या पंटरांना काही फरक पडत नसल्याने हा धंदा काही बंद होत नाही.

अनेक गुन्हे दाखल होऊनही तडीपार नाही !
संगमनेर शहरात मटका पेढ्या चालवणाऱ्या अनेकांवर एक नाही तर चार – चार, पाच – पाच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये शहरात नावाजलेले दोन मटका किंग देखील अनेक वेळा आरोपी झालेले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची साखळीच आहे. तरीही ही मंडळी तडीपार कशी केली जात नाही याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. इतर गुन्हेगारांना तीन गुन्हे दाखल झाले तरी तडीपार करण्यात येते. मटका धंद्यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची उदाहरणे आहेत. मटका किंग यांच्यावर एवढी मेहरबानी का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
