संगमनेरात मटका सुरुच ; एलसीबीचा छापा !
प्रतिनिधी —
जिल्ह्यातील पोलीस आणि पोलिसांच्या विविध पथकांच्या हप्तेखोरीला कंटाळून संगमनेरातील मटका धंदा बंद करण्याची राळ उठवणाऱ्या मटका किंग मंडळींकडून शहरात मटका जोमात सुरु ठेवण्यात आला आहे. नगर एलसीबीने शहरातील दिल्ली नाका या ठिकाणी कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकत एकाला पकडले आहे.
बशीर इसाक शेख, (वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाच्या पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहून देऊन मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलीस हवालदार सचिन अडबल, रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस नाईक विशाल गवांदे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता बशीर शेख हा मटका चालवताना दिसून आला त्यास पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले. १२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू असलेला संगमनेर तालुका हा नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मटका, जुगार अड्डे, गांजा तस्करी या शहरात तेजीत सुरू आहे. गोवंश हत्या तर नेहमीच्याच आहेत. या सर्व धंद्यांवर छापेमारी सुरू असली तरी ते कधीही बंद होत नाहीत. वसुलीच्या मोहिमांमुळे या धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दोन महिन्यापासून नगर एलसीबीने संगमनेर मध्ये अनेक छापे टाकून मटका अड्ड्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये शहरातल्या दोन्ही मटका किंगला आरोपी करण्यात आलेले आहे. असे असतानाही मटका अड्डे सुरूच आहेत. संगमनेर शहर पोलिसांच्या छुप्या पाठिंब्यावर हे अवैध धंदे चालू असल्याची चर्चा आहे.
