पाणीटंचाईची झळ 

संगमनेरात २५ टँकरने ३३ गावांना पाणीपुरवठा

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. रोजच उन्हाचा तडाखा वाढत असल्याने ३३ गावे, १६ गावठाणांसह १०७ वाड्यावस्त्यांवरील २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. आणि  उन्हाळ्याच्या अत्यंत तीव्र असल्याने अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे स्त्रोत पूर्ण क्षमतेने भरले नव्हते त्यामुळे वर्षभराचे पाण्याचे नियोजन कोलमडले. शेतीलाही मोठा फटका बसला. पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाणी देणेही मुश्किल झाले. त्याचा दैनंदिन जीवनमानावरच परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले. सध्या २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ४८ हजार ३४८ लोकसंख्येची रोज तहान भागवली जात आहे.

या मधे पठार भागातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. नव्याने सावरगाव घुले गावठाण आणि वनकुटे गावासह तीन वाड्यांना टँकर मंजूर झाले आहेत. यावरून अजूनही टंचाईची दाहकता असल्याचे दिसून येते. जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.

संगमनेर तालुक्यातील पानोडी, खरशिंदे, कुंभारवाडी, सोनोशी, सायखिंडी, खंडेरायवाडी, हिवरगाव पठार, काकडवाडी, कर्जुले पठार, पोखरी बाळेश्वर, चिकणी, पिंपळगाव देपा, डोळासणे, शेंडेवाडी, बिरेवाडी, चौधरवाडी, नांदूर खंदरमाळ, पेमरेवाडी, पारेगाव बुद्रुक, दरेवाडी, नान्नज दुमाला, पारेगाव खुर्द, चिंचोली गुरव, निमोण, जांभुळवाडी, कौठे मलकापूर, खांबे, सावरगाव घुले, मालदाड, माळेगाव पठार, साकूर या गावांतील १०७ वाड्या-वस्त्यांवरील ४८ हजार ३४८ लोकसंख्ये साठी पाणी पुरवठा केला जात आहे.

चांगला पाऊस होणार असल्याचेही सांगितले जात असले तरी पाऊस सुरू झाल्यानंतर उपलब्ध पाण्याच्या स्रोतांमधून पाणी मिळेपर्यंत पाणीटंचाईचा सामना करावाच लागणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!