दुग्धविकास मंत्र्यांची जाहिरातबाजी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार — डॉ. अजित नवले

प्रतिनिधी —

राज्यात दुधाचे भाव सातत्याने कोसळत असताना शेतकरी श्रीमंत होणार, शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार, मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार अशी जाहिरातबाजी करून राज्याचे दुग्धविकास तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया देत कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनी दुग्ध विकास मंत्री आणि सरकारचा तीव्र निषेध केला आहे.

डॉक्टर नवले यांनी मंत्र्यांच्या या जाहिरातबाजीवर संतप्त होत सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त केली असून सरकारवर जबरदस्त टीका केली आहे. दुधाचे भाव आणखी कोसळलेले असताना दुग्धविकास मंत्री काय जाहिरात करत आहेत पहा असे म्हणत नवले यांनी सोशल मीडियावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

अजित नवले यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. अनुदानाची घोषणा झाली मात्र अटी शर्ती व ऑनलाइन डेटाच्या जटीलतेमुळे शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाच रुपयाच्या न मिळालेल्या अनुदानाच्या जोरावर शेतकरी श्रीमंत होणार असल्याच्या जाहिराती करत असतील तर यापेक्षा अधिक खेदजनक दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही.

राज्यातले सरकार व दुग्धविकास मंत्र्यांचा अशा जाहिरातीबाबत, असंवेदनशीलतेबाबत तसेच निष्क्रियतेबाबत करावा तेवढा निषेध थोडा आहे. असेही दूध उत्पादक शेतकऱ्या संघर्ष समितीचे डॉक्टर अजित नवले यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!