वंचितला मतदान म्हणजे भाजपला मदत –आमदार बाळासाहेब थोरात
भाजपाला २०० जागाही मिळणार नाहीत
उत्कर्ष रुपवतेंवर व्यक्त केली नाराजी
प्रतिनिधी —
वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना काँग्रेसने मोठी संधी दिली. आपल्याकडे कायम त्यांचा सन्मान होता. राज्यात आणि देशपातळीवरही काम करण्याची संधी होती. शिर्डी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आपण मोठा प्रयत्न केला हे सर्वांना माहीत आहे. मात्र रूपवते यांनी काँग्रेस सोडणे हे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे असे होईल त्यामुळे मशाल चिन्हावर सर्वांनी मतदान करावे असे आवाहन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे

देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. महाराष्ट्रात झालेली फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडले नाही. इडी, सीबीआय सह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्यायव्यवस्थेवरील दबाव सर्वत्र अस्थिरता यामुळे देशात भाजपा विरोधी मोठी लाट असून त्यांना २०० जागा सुद्धा मिळणार नाहीत तर राज्यात महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसून महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत असल्याने ४० पेक्षा जागा नक्की मिळतील असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

खांडगाव येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात, नांदेड येथील प्रा.यशपाल भिंगे, बीडचे दादासाहेब मुंडे, हिरालाल पगडाल, उत्तमराव घोरपडे, शिवसेनेचे अमर कतारी, ॲड.दिलीप साळगट, कैलास वाकचौरे, आरपीआयचे किरण रोहम, राजू खरात, संजय खामकर आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, पंतप्रधानांनी भाषण करताना दहा वर्षात केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षात करावयाची कामे याचा अहवाल जनतेला दिला पाहिजे. मात्र सध्याचे पंतप्रधान हे धर्माचे राजकारण करत आहेत. देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. न्यायव्यवस्था दबावात आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. मणिपूर मध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाला आहे. देशासाठी ऑलिम्पिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंवर अन्याय झाला. मात्र पंतप्रधानांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सर्वत्र अस्थिरता आणि अनागोंदी आहे. देशाच्या इतिहासात भाजपचा कालखंड हा काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल

तर महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडाफोडी आणि पक्षासह चिन्ह काढून घेणे हे जनतेला पचनी पडले नाही. त्यामुळे महायुतीबद्दल प्रचंड रोष आहे. राज्यात महाविकास आघाडीला मोठे अनुकूल वातावरण आहे. शिर्डी व नगरसह राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवा.

सध्याचे महायुतीचे खासदार दहा वर्ष कोणाला दिसले नाही. कोणतेही विकासाचे काम नाही मात्र बढाया मारण्यात ते पुढे आहेत अशी टीका करून कोणत्याही भूलथापांना बळी न पडता देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी व मताधिक्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून काम करा असे आवाहन केले.
डॉ. तांबे म्हणाले की, देशात भाजपा विरोधी मोठी लाट निर्माण झाली आहे. मोदींच्या कार्यकाळात सर्व क्षेत्रात मोठे अपयश आले आहे. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही निर्माण झाली आहे.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, दोन कोटी नोकऱ्या न देणाऱ्या भाजप सरकारने देशांमध्ये मोठी बेरोजगारी निर्माण केली आहे. गांधी परिवाराचा देशासाठी मोठा त्याग आहे. महागाईमुळे महिलांना मंगळसूत्र विकण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती भाजपने आणून ठेवली असल्याची टीका त्यांनी केली. याप्रसंगी दादासाहेब मुंडे, यशपाल भिंगे, हिरालाल पगडाल, अमर कतारी, सचिन दिघे यांची भाषणे झाली. तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी युवक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
