भाजप ‘मंगळसूत्र चोरांची टोळी’ असलेला पक्ष — खासदार संजय राऊत
प्रतिनिधी —
देशाच्या सीमांवर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षात ज्या हजारो सैनिकांच्या हत्या झाल्या त्या सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता यांना देशासाठी मंगळसूत्र बलिदान कराव लागलं त्या मंगळसूत्रांचा हिशेब कोण देणार असा घनाघाती सवाल करत जो महिलांच्या मंगळसूत्राला हात घाल तो ‘भारतीय जनता पक्ष हाच मंगळसूत्र चोरांची टोळी’ असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्र आणि देशातील निवडणुका विषयी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या आवडीचा हिंदू – मुसलमान असा खेळ सुरू केला असून लोकसभेच्या दोन टप्प्यातील मतदानानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. असेही ते म्हणाले.

लोकसभेचे मतदान झालेल्या पहिल्या टप्प्यातील १०८ जागांमध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. तर महाराष्ट्रात विदर्भातील पाच पैकी पाच जागांवर महाविकास आघाडी विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त झाल्याने आणि दुसऱ्या टप्प्यात आठ पैकी आठ जागांवर महाविकास आघाडी ही आघाडीवर राहणार असून नांदेडसह या ठिकाणी विजय मिळणार असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्रात महाविकास (इंडिया) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अकोले येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, अमित भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, काँग्रेस पक्षाचे शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक गायकवाड हे उपस्थित होते.

खासदार राऊत पुढे म्हणाले की, या देशातील महिलांचे मंगळसूत्र तुमच्यामुळे धोक्यात आले आहे. तुम्ही देश विकायला काढलात. तुमच्या उपद्रपांमुळे महिला, माता भगिनींना आपली मंगळसूत्रे गहाण ठेवावी लागली. विकावी लागली आहेत. मंगळसूत्रांचं बलिदान करावे लागलं ते गेल्या 70 वर्षात कधी झालं नाही.नोटबंदी करून संपूर्ण देशात घराघरात हाहाकार तुम्ही घडवून आणला. या काळात महिलांना आपले मंगळसूत्र विकून गहाण ठेवून काही काळ आपले घर चालवावे लागले. अचानक केलेल्या लॉक डाऊन मध्ये कारखाने, उद्योग बंद, मुलं बाळं घरी. करती माणसं घरी बसली तेव्हाही या देशातल्या महिला, भगिनींना घर चालवताना मंगळसूत्र विकून घर चालवावे लागले. बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण या महत्त्वाच्या गोष्टींसाठी गेल्या दहा वर्षात आपल्या मुलाबाळांसाठी मंगळसूत्र विकावे लागले. गहाण ठेवावे लागले. देशाच्या सीमेवर आणि काश्मीर सारख्या राज्यात दहा वर्षात हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. त्या वीर पत्नी आणि वीर मातांनी आपलं मंगळसूत्र देशासाठी बलिदान कराव लागलं त्याचा हिशोब कोण देणार असा गंभीर सवाल करत भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी हिंदुत्व आहे असा टोला राऊत यांनी लगावला.

देशातली भाजपची सत्ता उलथविण्याची ताकत महाराष्ट्रामध्ये आहे याची भीती मोदी शहा यांना वाटते. कारण महाराष्ट्रात ठिणगी पडली की देशात वनवा पेटतो. आता तर महाराष्ट्रात शिवसेनेची मशाल पेटली आहे. असे सांगत तुम्ही सगळे आयत्या बिळावरचे नागोबा आहात. तुमचे देशासाठी योगदान काय असा सवाल करील हा देश उभा करण्यात गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्याच शेतमालाला भाव मिळत नाही. याला जबाबदार कोण ? दूध आणि कांदा याचे तर या सत्ताधाऱ्यांनी वाटोळे केले आहे. गुजरातचा दोन हजार टन पांढरा कांदा विकला जावा म्हणून निर्यात बंदी उठवली. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा नाही. गुजरात म्हणजेच देश आणि मी गुजरातचा पंतप्रधान आणि गृहमंत्री असे मोदी शहांना वाटते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपवायचं काम या सरकारने केल असून सुडाच राजकारण ते करीत आहेत.

ही निवडणूक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक भविष्य घडवणारी निवडणूक आहे. पुढील भवितव्याची निवडणूक आहे. आमचे भविष्य आम्ही घडवणार आहोत, मोदी शहा नाही. या देशाला पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान पंतप्रधानांची परंपरा आहे. त्या देशात ‘तुळशीमध्ये भांगेचे रोपटे’ निघावे असे ‘खोटे बोलणारा पंतप्रधान’ मिळाला हे दुर्दैव आहे.

अकोले तालुक्यासह नगर जिल्हा हा चळवळीचा आणि आंदोलनाचा भाग म्हणून ओळखला जातो. पुणतांबा मध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याच्या विचारांची परंपरा अकोल्यामध्ये आहे. देशाच्या लढ्यात महाराष्ट्र सदैव प्रामाणिक पुढे असतो. म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्राला घाबरतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. म्हणून तर गेल्या एक महिन्यात 17 वेळा मोदी शहा राज्यात येऊन गेले.

शिर्डी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाच्या संदर्भात बोलताना खासदार राऊत म्हणाली की, आता त्यांना नवीन रामायण माहित नाही. आयोध्येतील रोषणाई रामाला आवडली नाही. कारण रामाला आणावे यासाठी विद्युत रोषणाई मोठा डामडौल केला. मात्र शेतकरी यायचे म्हटले तर रस्त्यावर खिळे ठोकले जातात. अश्रू धुरांच्या नळकांडे फोडले जातात. हे रामाला आवडले नाही. कारण राम हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा राजा होता. त्यामुळे शेतकऱ्यांवरचा अन्याय रामाला मान्य होणार नाही. शिवसेना फोडून रावणाच्या चोरांच्या हातात दिली. त्यादिवशीच रामाने धनुष्यबाण खाली ठेवले आणि हातात मशाल घेतली आहे. त्यामुळे फडणवीस शिंदे यांची लंका आता जळाल्याशिवाय राहणार नाही असा घनाघातही त्यांनी केला.

विरोधी उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विषयी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, स्वर्गीय दादा कोंडके यांचा एक उत्कृष्ट चित्रपट होता एकटा जीव सदाशिव. कधीही मतदारसंघात न फिरणारा आणि सर्वसामान्यांची कामे न करणारा हा विरोधी उमेदवार चार जून नंतर एकटा जीव सदाशिवच राहणार आहे. त्याच्याबरोबर कोणीच फिरणार नसल्याने एकट्यालाच फिरावे लागणार आहे हे तुम्ही पाहणार आहातच.

राहुल गांधीं बरोबर मी पठाणकोट ते जम्मू अशी भारत जोडो पदयात्रा केली. ही पदयात्रा विचारांची आणि परंपरेची, घराणेशाहीची ही पदयात्रा होती. कारण या घराण्याची मोठी परंपरा आहे. ‘ज्याला घरच नाही त्याला काय घराणे असणार ? असा टोला देखील राऊत यांनी लगावला.
शिवसेनेचे चिन्ह मशाल सर्वत्र घराघरात पोहोचवा महाराष्ट्रातील 48 जागा ह्या आपल्या सर्व महाविकास आघाडीच्या आहेत. इंडिया अलायन्सच्या आहे.त सर्व जागांविषयी प्रचार व्यवस्थित करा. ही मशाल यावेळेस नुसती पेटणारच नाही तर भडकणार आहे असेही राऊत यांनी सांगितले.

आमदार शंकरराव गडाख
माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख म्हणाले की, अकोले तालुका पुरोगामी विचारांची खाण आहे. प्रगल्भ तालुका आहे. ही निवडणूक महत्त्वाची आहे. दहा वर्ष विरोधी उमेदवाराला मतदान केले आपल्या पदरात काय पडले याचा विचार करणे गरजेचे आहे. देशातील शेतकऱ्यांचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे. सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. शेतकऱ्यांनी मुला बाळांच्या भवितव्याचा विचार करून यावेळी मतदान करायला हवे.आपले सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय करेल, कोणतीही मागणी नसताना 24000 कोटी कर्जमाफी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीने केली होती. इंडिया आघाडीचे सरकार देखील हमीभाव, कर्जमाफी, पीक विमा हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध राहणार आहे असेही गडाख यांनी सांगितले.
याप्रसंगी अमित भांगरे, मधुकर तळपाडे, संदीप वर्पे, संदीप कडलग, कॉम्रेड डॉ. अजित नवले, अशोक गायकवाड यांची भाषणे झाली.
उपजिल्हाप्रमुख महेश नवले, रामा तिकांडे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ (पुर्व), संतोष मुर्तडक (पश्चिम), शहर प्रमुख शिवाजी शेटे, विधानसभा संघटक मधुकर तळपाडे, शहर संघटक नितीन नाईकवाडी, शहर समन्वयक प्रमोद मंडलिक, नंदकुमार वाकचौरे, सिताराम शेटे, भाऊसाहेब गोरडे, प्रदीप हासे, बाळासाहेब देशमुख, मंगलताई शेलार, जग्गू मैड, संदीप डोंगरे, विनोद देशमुख, राम सहाने, सचिन मुर्तडक, बाळा येलमामे, अर्जुन खोडके, गोरख घाणे, अमर कतारी, कैलास वाकचौरे, ॲड. दिलीप साळगट आदी उपस्थित होते.
