त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती होणार आहे — आमदार बाळासाहेब थोरात
प्रतिनिधी —
देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यातील, नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. अशा ‘त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती होणार आहे’ असा इशारा माझी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले आहेत. राज्यात वातावरण निवडणुकामय झाले आहे. असे असताना अकोले येथे महाविकास (इंडिया) आघाडीच्या सभेला परवानगी घेताना वेगवेगळ्या कारणांसाठी कार्यकर्त्यांना त्रास देण्यात आला. याची तक्रार माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी यांच्याकडे केली असता त्यांनी वरील विधान केले आहे.

अकोले येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, अमित भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, काँग्रेस पक्षाचे शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक गायकवाड हे उपस्थित होते.

या सभेसाठी परवानगी आणि इतर गोष्टी मिळवण्यासाठी प्रशासनाने खूप त्रास दिला अशी तक्रार आमदार थोरात यांचे भाषण सुरू असताना करण्यात आली. त्यावेळेस आमदार थोरात म्हणाले की, त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती होणार आहे. 4 जून नंतर त्रास देणार्यांच्या दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे. भाजपला निवडून द्यायचं नाही असा जनतेचा निर्णय झाला आहे. भाजपची सत्ता ही लोकशाहीला आणि राज्यघटनेला घातक असल्याने भाजप विषयी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मनात आस्था राहिलेली नाही. कामगार, अल्पसंख्यांक यांच्या विषयी सत्ताधाऱ्यांना सहानुभूती नाही. मणिपूरच्या आत्याचारावर देशाचे पंतप्रधान अवाक्षर हे बोलले नाहीत. साधी भेट देखील त्यांनी दिली नाही किंवा राष्ट्रपतींचा सन्मान केला जात नाही. अशा सत्ताधाऱ्यांना आदिवासी विषयी आस्था असणार नाही हे दिसून येते. हा देश हुकूमशाहीच्या वाटेने चालला असून राज्यघटना धोक्यात आली आहे असे सांगतानाच आमदार थोरात म्हणाले की, कोरिया मधील हुकूमशहा किम जोंगच्या हुकूमशाहीत जनतेवर जे दिवस आले आहेत ते तुमच्यावर येऊ देऊ नका. त्यामुळे निवडणुकीत चांगला निर्णय घेणे हे तुमच्या हातात आहे.

महाविकास आघाडीला राज्यात 40 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. ते म्हणाले की, विरोधी उमेदवार गेल्या दहा वर्षात कधीही मतदारसंघात फिरकले नाहीत. जनतेच्या संपर्कात आले नाहीत. फक्त निळवंडेच्या कामाचे श्रेय घेण्याचा उपद्व्याप ते करीत आहेत. एक रुपयाचा निधी देखील त्यांनी आणला नाही. त्यांनी आणला असेल तर दाखवा. तोंडी नाही तर पेपरवर दाखवा असे आव्हानच आमदार थोरात यांनी विरोधी उमेदवाराला दिले.

