नाराज शिवसैनिक आणि वाकचौरे वाद मिटले !
महाविकास आघाडीच्या मेळाव्या नंतर शिवसैनीक व उमेदवार वाकचौरे यांचे मनोमिलन
काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेही मानले शिवसैनिकांनी आभार !
प्रतिनिधी —
शिवसेनेशी गद्दारी केली म्हणून तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि शिवसेनेचे तत्कालीन पदाधिकारी यांचे वाद झाले होते. या वादाचे पर्यावसन कोर्ट कचऱ्यांमध्ये झाले आहे. शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या वाकचौरे हे पुन्हा शिवसेनेत (ठाकरे) आले असून ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. कडव्या आणि निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हा दाखल असल्याने आणि कोर्टात कामकाज चालू असल्याने भाऊसाहेब वाकचौरेंवर या शिवसैनिकांचा राग होता आणि नाराजीही होती. मात्र महाविकास आघाडीच्या मेळाव्यानंतर हे शिवसैनिक आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामध्ये मनोमिलन झाले असून वाकचौरेच्या प्रचारात हे शिवसैनिक सक्रीय सहभागी होणार आहेत.

२०१४ साली शिवसेना सोडून काँग्रेसवासी झालेल्या तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे व संगमनेर येथील कडवट शिवसैनिकांचे वाद विकोपाला गेले होते. पक्षासोबत गद्दारी केल्याचा जाब अमर कतारी, भाऊसाहेब हासे व अन्य शिवसैनिकांनी भर रस्त्यात विचारत शिवसेना स्टाईलने राज्यभरात गदारोळ निर्माण केला होता. वादाचे पर्यावसन एवढे विकोपाला गेले की वाकचौरे यांच्या शिवसेनेत (ठाकरे) झालेल्या घरवापसी नंतर देखील गेल्या दहा वर्षापासून शिवसैनिक कोर्टाच्या फेऱ्या मारत राहिले.

आधी शिवसैनिकांच्या वरील गुन्हे मागे घ्या तरच प्रचार करू असे तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक उघड भूमिका घेतली होती. संगमनेर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला.

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात काही वर्षांपूर्वी शिवसैनिकांतर्फे निषेध म्हणून एक तीव्र परिणाम करणारे आंदोलन केले गेले होते. सदर गुन्ह्यात शिवसेनेकांना दिलासा कसा मिळेल यासाठी आमदार थोरात यांनी मनाचा मोठेपणा दाखवत व शिवसैनिकांना एकदिलाने काम करण्याचा संदेश दिला त्याबद्दल शिवसेनेच्या अमर कतारी यांनी जाहीर आभार व्यक्त करत मनोगत केले.

मात्र स्वतःच्या पक्षातील उमेदवाराने शिवसैनिकांच्या वरील गुन्हे मागे घेतले नसल्याची खंत बोलून दाखवली. सभा संपताच युवासेना तालुकाप्रमुख अक्षय रावसाहेब गूंजाळ यांनी मध्यस्थी करत सामंजस्याची भूमिका घेत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच शिवसैनिक अमर कतारी आणि अन्य सहकाऱ्यांना सोबत घेत माजी शहर प्रमुख रावसाहेब गुंजाळ यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे मनोमिलन घडवून आणले. त्यानंतर शिवसैनिकांना न्यायालयीन बाबीत संपूर्ण सहकार्य करायचे आश्वासन वाकचौरे यांनी दिले. त्यानंतर अमर कतारी, भाऊसाहेब हासे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी एकत्रितपणे शिर्डी लोकसभा मतदारसंघात वाकचौरे यांचा प्रचार करुन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आणन्याचा शब्द दिला. यावेळी संगमनेर शहर व तालुक्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.
