साकुर येथे मुलीवरील अत्याचाराच्या घटनेत तुमच्या बगलबच्च्यांचा सहभाग…
आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता महसूल मंत्री विखे पाटील यांचा थेट आरोप
प्रतिनिधी —
लोकसभेच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराच्या सभांना सुरुवात केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता विविध आरोप केले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर आरोप म्हणजे संगमनेर तालुक्यातील साकुर या गावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारांमध्ये तुमचेच बगलबच्चे सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला असून तुम्ही त्या मुलीच्या कुटुंबियांना भेटायला देखील गेला नाहीत असाही आरोप त्यांनी केला.

माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि विद्यमान महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. विविध व्यासपीठावरून भाषण करताना किंवा प्रतिक्रिया देताना हे दोघेही नेते एकमेकांविरुद्ध आरोप करत असतात. असाच आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

वाळू तस्करी बंद झाली आहे. वाळूचे ठेकेदार, मुरुमाचे ठेकेदार संपले. माफिया नष्ट झाले आहेत. हे काहींना बघवत नाही. ‘गरीब विरुद्ध श्रीमंतांची लढाई’ या आमदार थोरातांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, आता संगमनेर तालुक्यातून देखील एखाद्या गरीब उमेदवाराला उभे करण्यात येईल त्यावेळी देखील गरीब विरुद्ध श्रीमंताचीच लढाई होईल असा टोला देखील विखे पाटील यांनी लगावला आहे.

साकुर मधील मुलीवर अत्याचार करणाऱ्या बगलबच्चांना आम्ही सोडणार नाही. त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिला.

एकंदरीत पाहता शिर्डी लोकसभा मतदार संघ आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या वेळी आजी – माजी महसूल मंत्र्यांकडून विकासाच्या ऐवजी एकमेकांवर टीका करण्याचे प्रकार सुरू आहेत. जशी जशी निवडणूक रंगत जाईल तसे तसे हे व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप जनतेला मोठ्या प्रमाणावर ऐकण्यास मिळणार आहेत.

