आमदार थोरात यांच्या प्रयत्नांमुळेच निळवंडे धरणासह दोन्ही कालवे पूर्ण – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
उजव्या कालव्याचे धुमधडाक्यात पाणी पूजन
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधून साकार झालेल्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पाण्याचे पूजन निमगाव खुर्द येथील गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात व मोठ्या आनंदात व जल्लोषात केले असून निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण कामातून पूर्ण झाले असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी काढले आहेत.

निमगाव खुर्द येथे उजव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन करण्यात आले. या वेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात, सरपंच संदीप गोपाळे यांसह परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नातून पूर्ण झाले आहे. डाव्या कालव्यातून पाणी दुष्काळी भागात आले आणि जनतेच्या आनंदाला पारावार उरला नाही. या कालव्यानंतर उजवा कालवा लवकरात लवकर होऊन सर्व भागाला पाणी मिळावे याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा राहिला आहे. 1999 मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी धरण व कालव्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती दिली. म्हाळादेवी येथील मोठा जलसेतूसह उजवा कालवा महाविकास आघाडी सरकारच्या काळातच पूर्ण झाला होता, फक्त पाणी सोडणे बाकी होते. यातही सरकारने दिरंगाई केली मात्र आज पाणी आल्याने सर्वत्र आनंद उत्सव झाला असून आमदार थोरात हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे जलनायक ठरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तर डॉक्टर जयश्री थोरात म्हणाल्या की, आज उजव्या कालव्याद्वारे पाणी आल्याने त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये निळवंडेचे पाणी जाईल तो माझ्या जीवनातील आनंदाचा दिवस आहे असे आमदार थोरात यांनी म्हटले होते. खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कामातून स्वप्न पूर्ण झाले असल्याच्या त्या म्हणाल्या.

याप्रसंगी मीनानाथ शेळके, बाजीराव कवडे, बाळासाहेब गोपाळे, एकनाथ गोपाळे, प्रभाकर गोपाळे, किरण कानवडे, शिरीष गोपाळे, राजेश गोपाळे, नवनाथ कातोरे, लता खताळ, सोमनाथ कानवडे, राहुल चंद्रमोरे, अरुण गुंजाळ, बाळासाहेब कानवडे, उन्नती महिला ग्राम संघ निमगाव खुर्दच्या अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संदीप गोपाळे यांनी केले सूत्रसंचालन बाळकृष्ण गांडाळ यांनी केले तर मनीष गोपाळे यांनी आभार मानले.

