ज्यांनी विरोध केला ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत — आमदार थोरात
निळवंडे उजव्या कालव्याचे जलपूजन
प्रतिनिधी —
महाविकास आघाडी सरकार असते तर ऑक्टोबर 22 मध्ये डाव्या कालव्यातून आणि मे 2023 मध्ये उजव्या कालव्यातून पाणी आले असते. मात्र सरकार बदलले आणि कामे थांबवली. तरीही आपणच पाठपुरावा केला. आज केलेल्या कामाचे समाधान होत आहे. या पाण्यामुळे पुढील अनेक पिढ्या समृद्ध होणार आहेत. पुनर्वसित शेतकरी, अधिकारी, कर्मचारी अनेकांनी खूप मदत केली. परंतु ज्यांनी विरोध केला तेच आता पाणी सोडले असे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.काम कोणी केले ते जनतेला माहिती आहे. अशी खोचक टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आर.बी राहणे, उत्तमराव घोरपडे, रामदास वाघ, डॉ. प्रमोद पावसे, तानाजी आहेर, नानासाहेब खर्डे, विजय राहणे, कैलास पानसरे, सुभाष गुंजाळ, रमेश गुंजाळ आदींसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निळवंडे धरण व डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला . अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केलेले धरण आणि दोन्ही कालव्यांमधून आलेले पाणी हे पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे असून केलेल्या कामाचा मोठा आनंद व समाधान होत असल्याचेही आमदार थोरात यांनी नमुद केले.

थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे घेतलेल्या पाणी परिषदेतून निळवंडे येथे धरणाचा निर्णय झाला. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आपण 1999 मध्ये पाटबंधारे राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली. अनेक अडचणीतून सातत्याने या कामासाठी निधी उपलब्ध केला. धरणाबरोबर डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम आपणच मार्गी लावले .

खरे तर काही स्थानिक खबरे तिकडे निरोप देतात आणि चांगल्या कामात खोडा घातला जातो. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण करून घेतले आहे. या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. सर्वांना पाणी मिळेल. याकरता मनोहरपूरा पॅटर्न सारखा नवीन संगमनेर पॅटर्न आपल्याला राबवायचा आहे. पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने सर्वसामान्य माणूस सुखावला हीच खरी मोठी आनंदाची देण असल्याचे ते म्हणाले

तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धारणासाठी जागा निवडली. त्यामुळे वरच्या भागातून कालवे आले.जास्तीत जास्त भागाला पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी नियोजन केले आहे. पाणी देणारे कोण आहे आणि या कामाचे श्रेय कोण लाटू पाहते आहे हे जनतेला कळत आहे. अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी नानासाहेब खर्डे, आराध्या गायकवाड, प्रमोद पावसे आदींनी मनोगत व्यक्त केले.
