संविधान आणि देश टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना लढायचे आहे — खासदार डॉ. अमोल कोल्हे
आमदार थोरात हे निष्ठावान आणि सुसंस्कृत नेते
प्रतिनिधी —
राज्यघटनेचा विचार सध्या धोक्यात आहे. संविधान आणि देश टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना लढायचे आहे. ज्या संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे. ते संविधान आणि देश वाचवण्यासाठी काम करा. मतदान कक्षात गेल्यानंतर पाच मिनिट वेळ लागतो, बटन दाबण्यासाठी पाच सेकंद लागतात. मात्र या पाच सेकंदांनी पाच वर्षाचे देशाचे भवितव्य बदलते म्हणून अत्यंत काळजीपूर्वक मतदान करा. असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या समृद्ध परंपरेचा इतिहास आहे. संकटे आले की लढायचे असते पळायचे नसते. हा स्वाभिमानाचा इतिहास प्रत्येकाने जोपासला पाहिजे महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार सुद्धा नाही. हा विचार प्रत्येकाने मनात ठेवा. असे रोखठोक मत खासदार कोल्हे यांनी व्यक्त केले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा समृद्ध इतिहास महाराष्ट्राला आहे. इतिहास हा फक्त घोषणा देण्यासाठी नसून प्रेरणा देत असतो. स्वाभिमानी महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही असे सांगताना सातत्याने जनतेमध्ये राहून गोरगरीब व सर्वसामान्यांचा शाश्वत विकास करणारे निष्ठावंत असलेले नामदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असल्याचेही ते म्हणाले.

जाणता राजा मैदान येथे संगमनेर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जेष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार निलेश लंके, आमदार सत्यजित तांबे, सत्यशील शेरकर, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब डांगरे, डॉ. जयश्री थोरात, रणजीत सिंह देशमुख, मनीष मालपाणी, उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात, आदी उपस्थित होते.

देशात सध्या महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, अनेकांचा रोजगार हिरावला जातो आहे. महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे पळवले जात आहेत. कांदा निर्यात बंदी केली आहे. हि अत्यंत कठीण परिस्थिती आहे. फक्त जाहिरातबाजी आणि भाषणबाजीवर न जाता राज्याचा इतिहास समजून घ्या. देशाचे भवितव्य समजून घ्या असे सांगताना प्रत्येकाने देश वाचवण्यासाठी कटिबद्ध रहा असे आव्हानही त्यांनी केले.

तर आमदार थोरात म्हणाले की, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा विचार आपण जपला आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने कायम आपल्यावर प्रेम केले आहे. जनता ही आई आहे. आणि आईचे हे प्रेम मोठे आहे. विकासामध्ये आपण कधीही राजकारण केले नाही.सर्वांना बरोबर घेत विकासाचे काम केले. संगमनेरच्या जनतेमुळे आणि पक्षाच्या नेतृत्वामुळे राज्यात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आणि राज्यातील गोरगरीब जनतेसाठी केला.

निळवंडे धरण व दोन्ही कालवे पूर्ण करून आता पाणी आले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे. ही विकासाची वाटचाल आपल्याला कायम ठेवायची आहे. मात्र यामध्ये काही लोक अडचणी निर्माण करून पाहत आहेत. अशा लोकांना वेळीच दूर करा.

देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. काँग्रेस हा राज्यघटनेचा व संत परंपरेच्या समतेचा विचार असून या विचारावर आपण काम करत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मधुकर भावे म्हणाले की, राज्याला आमदार बाळासाहेब थोरात व खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले. तर डॉ. जयश्री थोरात यांनी आभार मानले.
