पालकमंत्री विखे पाटलांसाठी

संगमनेरात प्रशासन – पोलिसांची दडपशाही सुरू ! 

प्रतिनिधी —

राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री आणि पालकमंत्री झाल्यापासून संगमनेर तालुक्यातील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांवर प्रशासनाच्या माध्यमातून दडपशाही करीत असल्याचे आरोप थोरात समर्थकांकडून झाले आहेत. वेळोवेळी या आरोपांनी संगमनेरचे राजकीय वातावरण नेहमीच ढवळून निघाले आहे. आता मात्र पालक मंत्री विखे पाटलांसाठी संगमनेरच्या महसूल आणि पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांवर दडपशाही सुरू केली असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

संगमनेर शहरातून वाहणाऱ्या म्हाळूंगी नदीवरील पूल साधारण दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात खचला होता. दोन वर्षात या फुलाच्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारे राजकारण आरोप प्रत्यारोप झाले. नवीन पूल बनविण्याच्या कामात त्यामुळे अडथळे आले. लवकरात लवकर हा पूल निर्माण होण्याऐवजी त्याचे काम दोन वर्ष लांबले. हे काम लांबवण्यात सत्ताधारी पक्षाचे काही पदाधिकारी कारणीभूत असल्याचे देखील आढळून आले.

दरम्यान आज बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या पुलाच्या कामाच्या शुभारंभाचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्र्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी साखळी उपोषण करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना आणि ‘म्हाळूंगी नदी पूल बनवा कृती समिती’च्या सदस्यांना उपोषण स्थळावरून प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने दडपशाही करून हुसकावून लावले आहे.

तसेच उपोषण स्थळावरील त्यांचा मंडप देखील पोलिसांनी काढून टाकला आहे. पूलाच्या निर्मिती साठी सत्याग्रह करणाऱ्या या आंदोलकांवर ही दडपशाहीची दादागिरीची काठी उगारण्यात आली असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतात. पोलीस आणि प्रशासनाच्या या दडपशाही आणि धोंडशाहीचा समितीच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडिया मधून समितीच्या सदस्यासह नागरिकांनी तीव्र नाराजी आणि नापसंती व्यक्त केली आहे.

संगमनेर शहरात यापूर्वीच तयार झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन देखील मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कामाचे श्रेय घेण्यावरून सुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियातून टीका करण्यात आली आहे.

दरम्यान म्हाळूंगी नदीवरील नव्याने तयार होणाऱ्या या पूलाला तयार होण्याआधीच ‘ पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील सेतू’ असे नाव देखील देण्यात आले आहे. अद्याप पूलाचे काम सुरू देखील झाले नसताना नाम फलक मात्र तयार झाला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!