संगमनेर शहरात पुन्हा गंठण चोरी… पुन्हा घरफोडी..!
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून बस स्थानकावरून सोन्याचे गंठण तर दिल्ली नाक्यावर घरफोडी करून वायर चोरून नेली आहे. त्याचप्रमाणे दररोजच्या मोटरसायकल चोरीच्या घटना ह्या रतीब घातल्याप्रमाणे सुरू आहेत.

संगमनेर बस स्थानकावर होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण थांबलेले नाही. बस स्थानकातून साकुर कडे जाणाऱ्या बस मध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. कोमल किशोर साळुंखे (वय २५, रा. साकुर, तालुका संगमनेर) या महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली असून संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार पारधी हे पुढील तपास करत आहेत.

शहरातील दिल्ली नाका परिसरात घरफोडी झाली असून मोटार वाइंडिंगची वायरचे सहा बंडल ६६ हजार रुपये किमतीचे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. दिल्ली नाका येथील साई प्रवरा इलेक्ट्रिकल या दुकानातून ही चोरी करण्यात आली आहे. या दुकानाचे शटर उचकटून, दुकानात आत मध्ये प्रवेश करून मोटार वाइंडिंगची वायर चोरून नेण्यात आली आहे. शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदीप बबन रहाणे (वय २९, रा. ओझर खुर्द, तालुका संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.

संगमनेर शहरातील बस स्थानकावर होणाऱ्या चोऱ्या बंद झाल्या नाहीत. पोलिसांकडून कुठलीही ठोस अंमलबजावणी होत नाही. वरिष्ठ दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. शहरातून दररोज रतीब घातल्याप्रमाणे मोटरसायकलची चोरी होत आहे. या सर्व प्रकारामुळे शहरातील पोलिसांकडून गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.

