पोलीस वसाहतीमधून चोरीला गेलेली वाळू तस्करीतील पिकअप महसूलच्या रखवालीत होती — सूत्रांकडून खुलासा
प्रतिनिधी —
वाळू तस्करी करताना पकडलेली व जप्त केलेली वाहने ही पोलिसांच्या रखवालीत नसतात ही वाहने महसूल विभागाच्या रखवालीत असतात. पोलीस लाईन मधून चोरीला गेलेले वाळू तस्करीचे वाहन हे महसूल खात्याच्या रखवालीत होते. विशेष म्हणजे अशी पकडलेली वाहने पोलिसांची कुठलीही परवानगी न घेता पोलीस लाईनच्या आवारात आणून लावली जातात. अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

एका वाळू तस्कराची जप्त केलेली पिकअप पोलीस लाईनच्या आवारात लावण्यात आली होती. ही पिकअप चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी बाबाजी किसन जेडगुले (मंडळ अधिकारी संगमनेर बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे ही पिकअप गाडी सदर मंडळ अधिकाऱ्याच्या रखवालीतच होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ती चोरीला गेली असल्याचे उघड झाले आहे.

संगमनेर शहरात जुन्या पोलीस वसाहतीमध्ये जप्त केलीली वाहने ठेवण्यात येतात. ही पोलीस वसाहत म्हणजे जप्त केलेल्या वाहनांचे एक गोडाऊन झाले आहे. येथे सर्व प्रकारचे वाहने आणून लावली जातात. महसूल विभागाने सुद्धा जप्त केलेली वाहने या ठिकाणी ठेवण्यात येतात. मात्र अशी वाहने ठेवण्यासाठी पोलीस खात्याच्या संबंधित विभागाकडून कुठलीही परवानगी घेतली जात नसल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे त्या वाहनांची जबाबदारी ही महसूल विभागाची असते. बऱ्याच वेळा पोलीस वसाहतीमध्ये ठेवलेल्या वाहनांची चोरी झालेली आहे किंवा त्यांचे स्पेअर पार्ट चोरीस गेलेले आहेत. वाळू तस्करीत जप्त केलेल्या गाड्या, ट्रॅक्टर देखील वाळू तस्करांनी चोरून नेले आहेत. त्यामुळे अशा घटना नेहमीच घडतात. यास पोलीस खाते जबाबदार नसून संबंधित महसूल विभाग व महसूल चे अधिकारी जबाबदार आहेत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कुछ तो गडबड है…
दोन दिवसांपूर्वी पोलीस पाठलाग करत असताना वाळू तस्करांची एक पिकअप खोल विहिरीत पडली व त्यात एकाचा मृत्यू झाला. या विहिरीत पडलेल्या पिकअपला सुद्धा नंबर प्लेट नव्हती. सदर घटनेतली पिकअप गाडी आणि चोरीला चोरीला गेलेली गाडी एकच असावी अशी शक्यता वर्तवली जात असून महसूल विभागाचे व संबंधित कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडू नये म्हणून घाईघाईत पिकअप चोरी झाल्याची आता फिर्याद देण्यात आली आहे. त्यामुळे अशा गडबड घोटाळ्याच्या प्रकरणात महसूल विभागाच्या काही मंडळींचा सहभाग असावा असा आरोप होत आहे.

