भृण प्रत्यारोपण सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारी – पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील

राज्यात सहा भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळांची स्थापना

देशी गायींचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्वकांक्षी निर्णय

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींची स्त्रीबीजे प्रयोगशाळेत फलित करुन सर्वसाधारण गायी आणि म्हशींमध्ये भृण प्रत्यारोपणाची सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्वावर सहा भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे. देशी गायी आणि म्हशींचे जतन व संवर्धन करण्याच्या व्यापक दृष्टीकोनातून हा महत्वकांक्षी निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने विविध योजना राबविल्या जात असतानाच राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आता पशुपालकांना दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रत्येक महसुली विभागात एक अशा एकूण सहा भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती यांचा समावेश आहे. तसेच या प्रयोगशाळेतून मोबाईल वाहनाच्या माध्यमातून ही सेवा थेट शेतकऱ्यांच्या घरांपर्यंत देण्यात येणार आहे.

एका उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी आणि म्हशींपासून ५० ते ६० उच्च उत्पादन क्षमता असणारी वासरे उपलब्ध होतील. या तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून उच्च दूध उत्पादन व प्रजनन अनुवंशिकता असलेल्या निवडक देशी जातींच्या गायी आणि म्हशींचे प्रजनन करून त्यांचा प्रसार होण्यास मदत होईल. तसेच नामशेष होत असलेल्या प्रजातींची संख्या कमीत कमी कालावधीत वाढवून सदर प्रजातींचे संवर्धन करता येईल. सदर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उच्च प्रतीच्या वळूंची निर्मिती करून असे वळू गोठीत विर्यमात्रा निर्मिती प्रयोगशाळेमध्ये विर्य संकलनासाठी व कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी वापर करता येतील. यामुळे राज्यातील गायी म्हशींची उत्पादन क्षमता वाढणार आहे आणि शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असून पशुपालकांना दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने देशी गायी आणि म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रत्येक महसुली विभागात एक अशा एकूण सहा भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहेत. देशी गायींचे जतन व संवर्धन करण्याच्या व्यापक दृष्टीने हा निर्णय सरकारने घेतला आहे. जेणेकरून पशुपालकांना उत्तम प्रतीचे देशी भृण उपलब्ध होईल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!