भोजापूरच्या पाणी संघर्षाला अखेर यश !
अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाणी तळेगावकडे
प्रतिनिधी —
भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले. मागील चार पाच दिवसांपासून जलसंधारण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या एकजुटीने भोजापूरच्या पाण्याचा विसर्ग तळेगावकडे मार्गस्थ झाल्याने अनेक वर्षाची प्रतिक्षा आज संपली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून शेवटच्या गावापर्यत पाणी मिळेपर्यत काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्यामुळे या कामाला चांगलीच गती आली आहे.

गेली अनेक वर्षे भोजापूर पाण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी लढा देत आहे. निळवंडे लाभक्षेत्रातून वंचित राहीलेल्या गावातील शेतकऱ्यांना भोजापूर धरणाच्या पाण्याचा लाभ मिळावा ही अपेक्षा होती. पण गेली अनेक वर्ष याबाबत निर्णय झाले नसल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहात होते. यंदा धरण भरले तरी पाणी मिळू शकत नाही ही बाब सहन करू न शकलेले शेतकरी रस्त्यावर उतरून पाण्यासाठी रात्र दिवस संघर्ष करीत असल्याची गंभीर दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी यासंदर्भात बैठका घेवून तसेच व्यक्तिगत पाठपुरावा करून चारीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते.

भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासनाने मागील तीन चार दिवसात रात्र दिवस जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदाईचे काम करून पाण्याच्या वहनातील सर्व अडथळे दूर केल्याने पाणी आज पिंपळ्या पर्यत पोहचले. आता तळेगावकडे पाणी जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांची अनेक वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात आली. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद शेतकऱ्यांनी गुलाल उधळून केला.

निळवंडे कालव्या प्रमाणे भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यानांही युती सरकारमुळे दिलासा मिळाला आहे. निळवंडे पासून वंचित राहीलेल्या गावांना आता भोजापूर धरणातील हक्काचे पाणी मिळाल्याने राजेंद्र सानप, नवनाथ महाराज गडाख, पांडूरंग फड, शिवनाथ चत्तर, किसनराव चत्तर, सोपान गिते, कचरू गिते, माधव महाराज, सतीष गीते, बबन घुगे, रंगनाथ पवार, अनिकेत गिते आदीनी समाधान व्यक्त केले आहे.

