केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविले
महाराष्ट्रातील शेतकरी बांधव हा अन्याय सहन करणार नाही – आमदार थोरात
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील या निर्णयावर सडकून टीका केली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगल्या भावाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. हे निर्यात शुल्क ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असणार आहे. केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. टोमॅटोनंतर कांद्याचे दर ही सामान्यांना रडवणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर देशातंर्गत महागाईला आळा घालण्यासाठी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. या निर्यात शुल्काच्या वाढीनंतर कांद्याच्या भावात घसरण होण्यास मदत मिळणार आहे.

बाजारात कांद्यांचे दर ३० ते ४० रुपये किलोच्या घरात आहेत. सरकारकडून काही दिवसांआधीच किंमती पाडण्यासाठी बफर स्टॉक बाजारात आणण्यात आला होता. देशात कांद्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात खराब दर्जाच्या कांद्याचे प्रमाण अधिक असल्याने चांगल्या प्रतीचा कांदा महाग झाला आहे.

निकृष्ट दर्जाच्या कांदा, सोबतच इतर भाज्यांचे दरवाढ कांद्याच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. देशाच्या एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी ४० टक्क्यांच्या जवळपास उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेण्यात येते.

महाराष्ट्रातील शेतकरी हा अन्याय सहन करणार नाही…
कांदा उत्पादक शेतकरी आधीच संकटात सापडलेला आहे. यापूर्वी सरकारने कबूल केलेले अनुदानही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा आणि शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे.
सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहता येत नसेल तर निदान त्यांच्या विरोधात तरी भूमिका घेऊ नये. महाराष्ट्रातील शेतकरी बांधव हा अन्याय सहन करणार नाही.
आमदार बाळासाहेब थोरात माजी कृषिमंत्री, महाराष्ट्र

