दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण ;
पतसंस्था फेडरेशन, सहकार खाते करते तरी काय ? सोशल मीडिया मधून उठले सवाल
पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह !
ठेवीदारांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून अशा घटनांमुळे ‘भविष्यात आणि सध्या संगमनेरचा समृद्ध सहकार अधिकाधीक बदनाम होऊ नये यासाठी स्थानिक नेतृत्वाने योग्य ती भूमिका बजावावी, आपले आहेत म्हणून कोणालाही पाठीशी घालू नये’ असाही चर्चेचा एक प्रवाह समाज माध्यमांमधून उमटला आहे.
प्रतिनिधी —
८१ कोटी रुपयांचा अपहार करून ठेवीदारांना देशोधडीला लावणाऱ्या दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या नातेवाईकांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर संगमनेरच्या पतसंस्था विश्वा विषयी सोशल मीडियावर चर्चेला उधान आले आहे. या चर्चांमधून पूर्ण सहकारच धारेवर धरला असल्याचे चित्र आहे. त्यातूनच पतसंस्था फेडरेशन नेमके करते काय ? असा प्रश्न उपस्थित झाला असून अशा घोटाळ्यांमध्ये पतसंस्था फेडरेशनने पुढे येऊन ठेवीदारांना धीर दिला पाहिजे तसेच गुन्हेगारांवर कडक कारवाई कशी होईल याबाबत ही भूमिका घेतली पाहिजे असा एक सूर या चर्चांमध्ये दिसून आला.

त्याचबरोबर संगमनेर तालुक्यात सहकारी पतसंस्थांचे जाळे मोठे असल्याने करोडो रुपयांच्या ठेवी या पतसंस्थांमध्ये आहेत अगदी सर्वसामान्य माणसापासून ते थेट श्रीमंत, व्यापारी, व्यावसायिक, छोटे मोठे दुकानदार, रिटायर नोकरदार यांच्या देखील ठेवी या पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या असतात. त्यामुळे ठेवीदारांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून ‘भविष्यात आणि सध्या संगमनेरचा समृद्ध सहकार अधिकाधीक बदनाम होऊ नये यासाठी स्थानिक नेतृत्वाने योग्य ती भूमिका बजावावी, आपले आहेत म्हणून कोणालाही पाठीशी घालू नये’ असाही चर्चेचा एक प्रवाह या माध्यमांमधून उमटला आहे.

पतसंस्थांच्या कारभारावर नियंत्रण आणि लक्ष ठेवणाऱ्या सहकार निबंधकांनी देखील आपले कर्तव्य बजावताना चाल ढकल करू नये. संगमनेर मध्ये पाच ते सहा पतसंस्था घोटाळ्यांमुळे बुडाल्या. ठेवीदारांचे देखील मोठे नुकसान झाले. आयुष्याची कमाई आणि स्वप्ने उध्वस्त झाली. मात्र कर्तव्यात कसूर म्हणून एकाही अधिकाऱ्याला त्या संबंधाने कुठल्याही कारवाईला सामोरे जावे लागले नाही. पतसंस्था सहकार उपनिबंधक खात्यातील संबंधित अधिकारी यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई व्हावी असा रोष या चर्चेमधून व्यक्त होत होता.

पाच सहा वर्ष दूधगंगा पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार होत राहिलेला दिसूनही तत्कालीन उपनिबंधक सहकारी संस्था यांनी कुठलीही कार्यवाही केलेली दिसत नाही. तसेच नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनीही कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे बोलले जात आहे. हा अपहार उघडकीस येऊन एक दीड वर्षाचा कालावधी झाला होता. पण दोन बड्या नेत्यांच्या आशीर्वादामुळे आणि पाठिंब्यामुळे कायदेशीर कारवाई होत नसल्याची देखील चर्चा होती. राजकीय लागे बांधे असल्यामुळे कारवाई होत नव्हती. मात्र त्याचे फळ ठेवीदारांचे आर्थिक आयुष्य उध्वस्त होण्यात मिळाले आहे.

एकंदरीत पाहता बँकेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे आणि आरोपींनी संगणमताने गोरगरीब ठेवीदारांच्या पैशाचा अपहार केला असल्याचा आरोप आहे. अजूनही पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करताना चाल ढकल केली जात असल्याने पोलिसांच्या कामकाजाविषयी देखील नाराजी व्यक्त होत आहे. पैशांच्या व्यवहाराबाबत पतसंस्थांचे धोरण हे कायमच गैरप्रकारात जास्त प्रमाणात आढळून आले असल्याचे बोलले जात आहे. पोलीस, पतसंस्थांशी संबंधित अधिकारी, सहकारी उपनिबंधक, प्रशासकीय अधिकारी, नेते, स्थानिक पुढारी सहकाराचे प्रणेते, पतसंस्था फेडरेशन या सर्वांनाच आता धारेवर धरले जाऊ लागले आहे.

