आटपाट नगरातला राजकीय फुगडीचा हॅपी खेळ !

एक महाराज रस्त्यावर उतरून हॅपी खेळ खेळत बसले… दुसरे सत्ताधीश विरोधी महाराज, ते रस्त्यावरचे खेळ कसे बंद पडतील याचे खेळ करत बसले… या खेळात जनतेचा मात्र खेळ झाला आहे…धरणाच्या बांधकामापासून ते धरणाच्या पाणी वाटपापर्यंत अनेक वर्षापासून चालू असलेले दोन्ही महाराजांचे दिखाऊ भांडण आता ‘काळवंडले’ आहे.

सध्या आटपाट नगरात हॅपी खेळाचे पेव फुटले आहे. नगराचे सुसंस्कृत महान महाराज त्यात आनंदाने हॅप्पी हॅप्पी करत सहभागी झाले. सर्वत्र धुमाकूळ झाला. नाच गाणे, डीजे, संगीत वाद्य, तंतुवाद्य, ढोल ताशे, घोषणा, जय जयकार, उदो उदो सर्व काही साग्र संगीत सुरळीत पार पडले.

हे हॅप्पी खेळ चालू असताना आटपाट नगरातल्या सर्वसामान्य जनतेचा जो मूलभूत समस्यांचा खेळ होतो, त्याकडे मात्र सोयीस्कर रित्या दुर्लक्ष झाल्याचे आढळून आले. आटपाट नगराचे महाराज, त्यांचे जवळचे प्रधानजी, नव्याने सुभेदार झालेले युवराज, आटपाट नगरीच्या जनपालिकेच्या तहहयात प्रमुख अशी सर्वच प्रमुख मंडळी आणि आटपाट नगराचे विविध क्षेत्रातले लाभार्थी, चमचे, हवशे, नवशे, गवशे सगळ्यांनी हॅपी खेळाचा आनंद घेतला.

महाराजांच्या अवतीभवती पिंगा घालत सामाजिक काम करणारे लाभार्थी आटपाट नगराच्या सर्वसामान्य रयतेच्या कुठल्याही कामाचे नाहीत हे रयतेला अधिक प्रमाणात भासू लागले आहे. आटपाट नगरातल्या सार्वजनिक निवडणुका, सुभेदारीच्या निवडणुका, आणि इतर महत्त्वाच्या निवडणुका झालेल्या नसल्याने आटपाट नगरीत सुद्धा ‘कोतवालांचे आणि घाशीरामांचे’ राज्य सुरू आहे.

त्यातच आटपाट नगरीवर आता पूर्वेच्या राज्याकडून एका दुसऱ्या सत्ताधीश महाराजांनी हल्लाबोल चालवलेला आहे. हा हल्लाबोल वृत्तान्त आटपाट नगरीच्या सर्वच बोरूबहाद्दरांच्या (अगदी आमच्यासह) लेखणीतून टपा टपा गळत असून रायतेची तो करमणूक करीत आहे. आटपाट नगरीचे महाराज आणि पूर्वेकडच्या आटपाट नगरीचे सत्ताधीश महाराज या दोघांचा संसार आणि भांडणांचा तमाशा रयत ‘याची देही, याची डोळा’ पिढ्यान पिढ्या अनेक वर्षांपासून पहात आहे.

आमचे आटपाट नगर काय आणि पूर्वेकडचे आटपाट नगर काय ? सर्वसामान्य रयतेच्या मूलभूत समस्या मात्र जैसे थे आहेत. आटपाट नगरीत मोसमात पाऊस झाला नाही. नगरीचा शेतकरी हवालदिल झाला. पिके वायाला गेली. बेरोजगारी, मजूर, रस्ते, वीज, पाणी समस्या डोके वर काढत आहेत. दोन्ही महाराज इकडून तिकडे फिरले. मदत काही अद्याप मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे रखडले आहेत. त्यांच्या संसाराचा मात्र पंचनामा झाला आहे.

नंतरच्या सुरू असलेल्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे आणि या सर्व गडबडीत दोन्ही आटपाट नगरीचे महाराज एकमेकांवर ‘तोंड सुख’ घेण्यात धन्यता मानत आहेत. आटपाट नगरांच्या पश्चिमेला असलेल्या पाण्याच्या एका पारंपारिक धरणातील पाण्यावरून दोघा महाराजांचा एकमेकांना त्याच पाण्याने ‘टीका टोमण्यांची अंघोळ’ घालण्याचा हॅपी खेळ दररोज सुरू असतो.

यावर कळस म्हणजे दोन्हीकडच्या महाराजांचे तथाकथित लाभार्थी, कार्यकर्ते, जनसेवक, सामाजिक पुढारी हे सुद्धा समाजसेवा सोडून दोघांचा उदो उदो करण्यात आणि या खेळात ‘लेझीम’ वाजवण्यात मजबूर झालेले दिसतात. या लाभार्थ्यांना जनता किती थारा देते हे दोन्हीकडच्या निवडणुकांमध्ये नेहमीच दिसून आलेले आहे. तरीही महाराजांच्या नादाला लागलेली मंडळी ‘नादी’ झाली असल्याचे नेहमीच दिसून येत आहे.

पूर्वेकडच्या महाराजांच्या आधी त्यांच्या महान पिताश्री भूषण बादशहांच्या लाभार्थ्यांचे सध्या काय हाल आहेत हे एकदा नव्याने महाराजांच्या ‘नादी’ लागलेल्या लाभार्थ्यांनी तपासून पाहायला हवे. त्या बादशहाच्या नादी लागलेले सर्वच लाभार्थी आता ‘धक्क्याला’ लागले आहेत. लाभार्थ्यांचा, कार्यकर्त्यांचा वापर करायचा आणि आपल्या सुभेदारीच्या पोळ्या भाजायच्या असा महाराजांचा ‘पारंपारिक गृह उद्योग’ नेहमीच चालू असतो. आमच्या आटपाट नगरीचे महाराज आणि पूर्वेकडचे सत्ताधीश महाराज यांच्या हॅपी भांडणांचा निकाल मात्र कधीच लागला नाही. लागणार नाही. त्यातच त्यांची, त्यांच्या कुटुंबीयांची सुभेदारी आणि राजेशाही सत्ता कायम टिकून राहण्याची मेख दडलेली आहे.

