हॅपी हायवे च्या दिव्याखाली दिवसा उजेड रात्री अंधार !
साग्रसंगीत सुरू झालेले स्ट्रीट लाईट दुसऱ्याच दिवसापासून बंद ..
प्रतिनिधी —
संगमनेर शहरामधून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील ‘हॅपी हायवे’ कार्यक्रमासाठी गाजावाजा करत साग्रसंगीत सुरू झालेल्या स्ट्रीट लाईटची ‘दिवसा चालू तर रात्री बंद’ अशी अवस्था अवघ्या दोनच दिवसात झालेली आहे.

संगमनेर शहरातून जाणारा नाशिक पुणे हायवे जुना महामार्ग सुशोभित करण्यात आला होता. या हायवेचे रुंदीकरण आणि दुरुस्तीकरण करण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने सुमारे ६५ कोटी रुपये खर्च केले.

नुकताच आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून ‘हॅपी हायवे’ हा कार्यक्रम घेण्यात येऊन या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट थोरात यांच्या हस्ते सुरू करून या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषण करण्यात आले होती. रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर मध्ये असलेले स्ट्रीट लाईट चालू करण्यात आले होते. रस्त्याच्या बाजूच्या भिंती रंगवण्यात आल्या होत्या. विविध खेळ, संगीत, लेझर शो, फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशे असा भरगच्च कार्यक्रम करून या हॅपी हायवेचे लोकार्पण करण्यात आले.

या हॅपी हायवे कार्यक्रमावरून संगमनेर भाजपा व आमदार बाळासाहेब थोरात आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राजकीय कलगीतुरा देखील रंगला होता. कार्यक्रमात राजकारण झाल्याचे आरोप प्रत्यारोप देखील झाले. निधी केंद्राचा की राज्याचा यावरूनही वाद झाला. निधी आम्हीच दिला म्हणून उद्घाटने तीन तीन वेळा करण्यात आली.

एवढे होऊनही या हायवे वरचे पथदिवे बंद पडलेले आहेत. केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो दिवे काही लावू शकले नाहीत. त्यामुळे ‘हॅपी हायवेच्या दिव्याखाली दिवसा उजेड, रात्री अंधार’ असा प्रकार आढळून येतोय.

संगमनेरकरांना प्रशासकीय कामांचे वेगवेगळे अनुभव येणे नवे नाही. हॅपी हायवेच्या रात्री रस्त्याच्या मधोमध असलेले स्ट्रीट लाईट रात्रभर चमकले. मात्र दुसऱ्या दिवशीपासून लाईट बंद झाले. ते बंद का झाले ? कसे झाले ? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कार्यक्रमासाठी जोशात सुरू करण्यात आलेले हे स्ट्रीट लाईट नंतर मात्र ‘दिवसा चालू आणि रात्री बंद दिसत आहेत. शनिवारी दिवसा दिवसाढवळ्या स्ट्रीट लाईट चालू होते. ते रात्री पूर्णपणे बंद होते. या स्ट्रीट लाईटचे नियंत्रण करणारी मंडळी नेमकी काय करत आहे हे समजायला मार्ग नाही.

