महसूल मंत्री विखे पाटील यांच्या सूचनांना हरताळ !
निळवंडे कालव्यामधून सध्या तरी लगेच पाणी येण्याची शक्यता धूसर !
विशेष प्रतिनिधी —
निळवंडे धरणाच्या कालव्यांमधून २७ सप्टेंबर रोजी पाणी सोडणार अशी दमदार जाहीर घोषणा करून देखील कालव्यांमधून पाणी न आल्याने राज्याचे महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनांना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सरळ सरळ हरताळ फासण्याचे काम सुरू असल्याने विखे पाटील यांचा प्रशासनावर असलेला दबदबा आणि पकड ढीली होत असल्याचे बोलले जात असून त्यांच्या सूचनांना अधिकाऱ्यांकडून कुठलीही किंमत दिली जात नसल्याची चर्चा आहे.

विशेषतः जलसंपदा विभागाशी त्यांची नेहमीच खडाजंगी झाल्याचे चित्र आहे. पालकमंत्री विखे यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी वेळकाढूपणा करीत असल्याचे निदर्शनास आणून त्यांच्या या धोरणाबाबत सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. निळवंडे धरण, धरणाचे पाणी आणि या धरणाचे कालवे हा नगर जिल्ह्यातील राजकीय पुढार्यांसाठी खास राजकारणाचा विषय आहे. त्यामुळे निळवंड्यासाठी मी काय केले, कसे केले, किती केले हे सांगण्यात अनेक पुढारी आघाडीवर असतात आणि श्रेय घेण्यासाठी धडपड करत असल्याचे नेहमीच दिसून आले आहे.

निळवंडे धरणाच्या कालव्यांमधून पाणी सोडावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, शेतीचे नुकसान होणार नाही. असे सांगितले जाते. तसेच निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत नसल्याने माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी गेल्या एक ते दीड महिन्यापासून कालव्यातून पाणी सोडण्याची जोरदार मागणी लावून धरली आहे आणि त्या संदर्भाने निर्णय घेतला असल्याने टीकाही केली आहे.

टंचाई आढावा बैठकीच्या वेळी आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या वेळी महसूल मंत्री विखे पाटील यांनी सप्टेंबर महिन्याच्या २७ तारखेला निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यावेळी सुद्धा हे पाणी सोडण्याची तारीख ३० सप्टेंबर की २७ सप्टेंबर याबाबत बरीच खलबते विखे पाटील आणि अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती. विखे पाटलांचा आग्रह २७ तारखेचा होता तर अधिकारी ३० तारखेला पाणी सोडण्याचे प्रयत्न करू असे सांगत असल्याचे विविध माध्यमातून दिसून आले आहे.

त्यानंतर संगमनेर येथील विश्रामगृहावर विखे पाटील आले असता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांविषयी, त्यांच्या भूमिकेविषयी विखे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पाणी सोडण्याच्या दोन्हीही तारखा निघून गेल्या असून आता ऑक्टोबर महिन्याची ३ तारीख उगवली असली तरी निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही. तसेच येत्या काही दिवसात तातडीने पाणी सोडण्यात येणार नसल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनांचा प्रशासकीय स्तरावर किती आदर केला जातो आणि किती गांभीर्याने दखल घेतली जाते हे दिसून आले आहे, अशी टीका विखे विरोधक करत आहेत.

पाऊस आणि जमिनीतील ओलाव्यामुळे अडचण
अकोले, संगमनेर तालुक्यांसह कालवे ज्या भागातून जातात त्या बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होता. सप्टेंबर महिन्यात गणेश उत्सवापासून जोरदार पाऊस सुरू होता. या भागातली बऱ्याच ठिकाणी काळया मातीची जमीन असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी जमिनीत ओल धरली जाते. त्या ठिकाणी वाहने नेण्यास, मशिनरी नेण्यास अडचण होते. बरेचसे मातीचे काम असल्याने चिखल झाल्यानंतर हे काम करता येत नाही. चालक, वाहन मालक रिस्क घेत नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी कालव्यांचे काम किंवा गळती आढळलेली असल्याने पाणी सोडण्यास विलंब होत आहे. पूर्ण पाऊस थांबल्यानंतर आणि जमिनीचा ओलावा कमी झाल्यावर कामे सुरू होऊन पाणी सोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपच्याच मंडळींकडून विखे यांना अडथळा ?
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विविध लहान मोठ्या निर्णयांबाबत व कार्यपद्धती बाबत भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना अडचणी होत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. मंत्री पातळीवर आणि त्यांच्या पक्षातील काही अंतर्गत हितचिंतकांमुळे विखे पाटील यांच्या सूचनांना किंवा त्यांच्या आदेशांना, निर्णयांना दुर्लक्षित केले जात असून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना छुप्या पद्धतीने विखे पाटलांचे जास्त मनावर घेऊ नका असे सुचविले जात असल्याचे बोलले जात आहे.

