दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण ;
मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि परिवाराचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
आता आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष !
रेंगाळलेल्या तपासात प्रगती होण्याची शक्यता
प्रतिनिधी —

संगमनेरच्या सहकार क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. तर तुरुंगात असलेल्या व न्यायालयीन कोठडी भोगत असलेल्यांचा जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी आज सायंकाळी (मंगळवारी) मंजूर केला.

साधारण गेल्या महिनाभरापासून ठेवीदारांना न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली होती. भाऊसाहेब कुटे आणि अन्य आरोपींच्या जामीन अर्जाला आक्षेप घेत सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद करत या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे मुख्य आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. आता याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा नगरचे तपास अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल ८१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आल्यानंतर संगमनेरच्या अर्थकारणात मोठी खळबळ उडाली. संगमनेर सह अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील प्रतिष्ठित असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे याच्यासह २१ जणांवर या अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.

तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकासह पाच जणांना अटक केली होती. तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर रेंगाळल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणी तपासात अद्याप फारशी प्रगती झाली नाही. आरोपी राजकीय प्रतिष्ठित असल्याने आणि त्यांचे नातेसंबंध थेट मंत्रालयात सरकारपर्यंत असल्याने या प्रकरणात तपास यंत्रणेवर मोठा दबाव असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांकडून अद्याप नव्याने कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे दिसते.

दरम्यान याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याने व त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी शकुंतला कुटे यांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. याशिवाय यातील आरोपी लेखापरीक्षक अरुण के. बुरड यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी तसेच न्यायालयीन कोठडीत असलेले लेखापरीक्षक अमोल क्षीरसागर, बँकेचे कॅशियर लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते यांनी देखील जामीन अर्ज दाखल केले होते. या जामीन अर्जाची सुनावणी झाली.

सायंकाळी न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्याच्या कुटुंबाच्या वतीने दाखल करण्यात आलेले दोन्ही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे आता कुटे याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून पोलीस यंत्रणा कुटेसह त्याच्या कुटुंबीयांना कधी अटक करते याकडे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकारणी गुन्हा दाखल झालेले इतर आरोपीही अद्याप मोकळे असून पोलीस त्यांच्यावर देखील काय कारवाई करतात याकडे सभासद, ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. तर लेखा परीक्षक असलेल्या अरुण बुरुड याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.

सरकार पक्षाच्या वतीने ॲड. मच्छिंद्र गवते, मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि कुटे परिवाराच्यावतीने नाशिक येथील ॲड. राहुल कासलीवाल, ॲड. सुशांत कवडे, अरुण बुरड यांच्यावतीने मुंबई येथील ॲड. सौरभ राऊत व संगमनेर येथील ॲड. ऋषिकेश वाणी, अमोल क्षीरसागर यांच्यावतीने ॲड. के. जी. कुलकर्णी व ॲड. स्मिता सस्कर, लहानु कुटे याच्यावतीने ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील, उल्हास थोरात यांच्या वतीने ॲड. अतुल आंधळे यांनी तर ठेवीदारांच्या वतीने ॲड. सिद्धी वैद्य, जनार्दन वाळुंज यांनी काम पाहिले.

