संगमनेर बस स्थानकात सोन्याचे दागिने आणि पैशांची चोरी !
१ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास ; पाकीट मारी, पर्स चोरी सुरूच..
पोलिसांबरोबर एसटी प्रशासनही सुस्त
प्रतिनिधी —
संगमनेर बस स्थानकात दोन दिवसात चोरीच्या आणि पाकीट मारिच्या घटना घडल्या असून या मधे १ लाख ३२ हजार रुपये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ही चोरून गेले असल्याचे उघडकीस आले आहे.

संगमनेरचे बसस्थानक दागिने आणि रोकड चोरांसाठी सॉफ्ट टारगेट ठरले आहे. बस स्थानकावरील सातत्याने घडणाऱ्या दागिने, रोकड चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसह बस स्थानक प्रशासन आणि येथील सुरक्षारक्षक नेमके करतात काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरीच्या या घटनांना एसटी प्रशासनच कारणीभूत असल्याचे बोलले जाते. दागिने चोरीच्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक घटना बस स्थानकामध्ये घडल्या आहेत.

दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी रविवारी बस स्थानकामध्ये दागिने आणि रोकड चोरीच्या दोन घटना घडल्या. विशेष म्हणजे एकाचवेळी सायंकाळी चारच्या सुमारास नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील ४६ हजार रुपयांचे दागिने असलेला डबी तर एका व्यापाऱ्याच्या खिशातील ६ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. तर दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी सोमवारी एका महिलेच्या गळ्यातून ८० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरण्यात आले आहे.

दिपाली सचिन पाटील (रा. अमृतधाम, पंचवटी, नाशिक) ही महिला शनिवारी नाशिक येथून अकोले तालुक्यातील वीरगाव येथे आपल्या माहेरी आली होती. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही महिला संगमनेर बस स्थानकातून नाशिककडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना बस भोवती असलेल्या गर्दीचा फायदा घेत कोणीतरी या महिलेला धक्का दिला.

आपल्या जवळील पर्सची चैन उघडी असल्याचे खाली उतरलेल्या महिलेच्या लक्षात आल्याने तिने पर्स उघडली असता पर्समध्ये ठेवलेली दागिन्यांची डबी गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी तिच्या पर्समधील डबीतील ४६ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले आहेत. पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

दुसऱ्या घटनेत याचवेळी नाशिककडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना व्यापाऱ्याचा खिसा कापण्यात आला. मारळगाव (कल्याण) येथील व्यापारी रामचंद्र रहेदोमल रोरा हे व्यापारानिमित्त संगमनेरला आले होते. ते नाशिकला जाण्यासाठी नाशिकच्या बसमध्ये चढत असताना गर्दीत कोणीतरी त्यांच्या खिशात हात घातल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी बसमध्ये न चढता खाली उतरून घेत खिशातील पैसे तपासले असता खिशातून ६ हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले. याप्रकरणी देखील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १८ सप्टेंबर रोजी सोमवारी देखील बस स्थानकात पुन्हा सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शोभा अशोक हिरे या महिला अकोले येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. चार तोळे सोने सोन्याचे वजन असलेले हे मंगळसूत्र ८० हजार रुपयांचे असल्याचे पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी देखील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एकंदरीत दोन दिवसांमध्ये संगमनेर बस स्थानकातून १ लाख ३२ हजार रुपयांच्या चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत.

