दूधगंगा पतसंस्था घोटाळा !

आरोपींना पकडण्यात पोलिसांकडून दिरंगाई ; तपास रेंगाळला

सगे सोयऱ्यांकडून पोलिसांवर राजकीय दबाव ?

प्रतिनिधी —

संपूर्ण नगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या संगमनेर तालुक्यातील दूधगंगा  पतसंस्थेच्या ८१ कोटीच्या गैरव्यवहारात अडकलेल्या आरोपींना अटक करण्याबाबत पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचे दिसत असून हा तपास रेंगाळला असल्याचे बोलले जात आहे. संगमनेर शहर पोलिसांनी सुरुवातीला अटक केलेल्या पाच आरोपी नंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा नगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता त्यानंतर एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या गुन्ह्यात २१ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

यातील काही आरोपींचे सगे सोयरे हे राजकीय क्षेत्रात मोठ्या पदांवर आहेत. काही सरकारमध्ये सहभागी आहेत. अशा बड्या राजकीय नेत्यांकडून पोलिसांवर दबाव येत असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे आरोपी मोकळे फिरत असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही असे बोलले जात आहे.

संगमनेरच्या समृद्ध सहकाराला अडचणीत आणणाऱ्या आणि पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा करणाऱ्या मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह अन्य आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय लवकरच समोर येण्याची चिन्हे आहे. न्यायालयाच्या निर्णयाची ठेवीदारांना प्रतीक्षा लागली आहे. गेल्या ३० वर्षांपासून संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा तब्बल ८१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा समोर आला आहे.

याप्रकरणी पतसंस्थेचा चेअरमन व या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब गायकवाड, छत्रपती संभाजी नगर येथील चेतन नागराजबाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, सोनाली दादासाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील प्रतिष्ठित कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम या कदम परिवारातील सदस्यांसह सावेडी अहमदनगर येथील संदीप दगडू जरे या १५ जणांवर तब्बल ८१ कोटी रुपयांच्या अपहाराचा ठपका आहे.

याशिवाय बँकेतील कॅशियर लहानु गणपत कुटे, उत्तम शंकर लांडगे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते यांच्यासह संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षक अरुण बुरड व अमोल क्षीरसागर यांनी त्यांना सहाय्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी पैकी व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ व अपहाराला सहाय्य करणाऱ्या लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तीन रोखपालांसह अमोल प्रकाश क्षीरसागर या वैधानिक लेखापरीक्षकाला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास थंडावला आहे.

मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोदर कुटेने संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्वतंत्र अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. तर कुटे परिवाराच्या वतीने एकत्रित अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नाशिक येथील सनदी लेखापाल असलेल्या अरुण बुरड यांनी देखील स्वतंत्र अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. याशिवाय अटकेत न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघांनी जामीन मिळण्यासाठी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे.

या सर्व अर्जांवर न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्याने आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचे मानले जाते. या सर्व जामीन अर्जांवर आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद झाला असून आता सरकार पक्षाचा युक्तिवाद बाकी आहे. सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांचा युक्तिवाद झाल्यानंतर याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात…

दरम्यान या प्रकरणी अद्यापही उर्वरित आरोपी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शहरात वावर असणाऱ्या या आरोपींना तपास अधिकारी का पकडू शकले नाही ही बाब देखील ठेवीदारांना संभ्रमावस्थेत टाकणारी आहे. यातील बहुतांशी आरोपींनी अद्यापही जामीन अर्ज दाखल केलेला नसून पोलिसांचे हात देखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. दरम्यान यासंदर्भात आरोपींना असलेला राजकीय वरदहस्त आणि पोलिसांकडून तपासाबाबत होत असलेली हेळसांड कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!