वाळू तस्करी, महसूल अधिकाऱ्यांचे लागेबांधे यातून महसूल मंत्र्यांचे फसलेले वाळू धोरण चव्हाट्यावर !
वाळू माफियांवर कारवाईच्या फक्त पोकळ वल्गना !
विशेष प्रतिनिधी —
संपूर्ण राज्याचे महसूल मंत्री पद मिळाल्यापासून फक्त वाळू माफिया आणि वाळू तस्करी यावरच काम करणारे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यासह मतदारसंघातील काही गावांमध्ये आणि संगमनेर तालुक्यात वाळू माफीयांची आणि वाळू तस्करांची मुजोरी वाढल्याचे चित्र समोर आले असून थेट तहसीलदारांना घरी जाऊन धमक्या आणि शिवीगाळ करण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

वाळू तस्करांची ही वाढती दादागिरी पाहता आणि वाळू तस्करीला कुठलाही आळा बसलेला नसलेले चित्र पाहता महसूल मंत्री झाल्यापासून विखे पाटील यांनी वाळू तस्करी, वाळू माफिया यांच्याबाबत केलेल्या घोषणा ह्या फक्त हवेतल्या वल्गना ठरल्या आहेत.

वाळू तस्करांची तहसीलदारांना धमक्या देण्यापर्यंत गेलेली मजल, महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे तस्करांशी असलेले लागे बांधे आणि महसूल मंत्री विखे पाटील यांचे फसलेले वाळू धोरण यावर आता संपूर्ण जिल्ह्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

राज्याचे महसूल मंत्री पद मिळाल्यानंतर नगर जिल्ह्यातील वाळू तस्करी बंद पाडणार, वाळू माफियांच्या मुस्क्या आवळणार, राज्यासाठी निश्चित वाळूधोरण आणणार अशा अनेक घोषणा करणारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्यातील वाळू तस्करी थांबलेली नाही. एवढेच नव्हे तर या वाळू तस्करीतून मुजोर झालेल्या वाळू माफियांनी संगमनेरच्या तहसीलदारांना त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ आणि धमक्या देण्याचे प्रकार केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना मध्यरात्रीच्या वेळी त्यांच्या घरात घुसून शुभम थोरात नावाच्या एका वाळू तस्कराने शिवीगाळ केली, धमक्या दिल्या. अनेक वेळा फोन करूनही फोन उचलत नाहीत याचा राग येऊन या वाळू तस्कराने तहसीलदारांना धमक्या आणि शिवीगाळ केली. तहसीलदार यांनी यासंदर्भात सकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येत गुन्हा नोंदवला यातूनच वाळू तस्करी किती मोठ्या प्रमाणात चालू आहे हे उघड झाले.

मध्यरात्री फोन करण्याचे नेमके कारण काय ?
एवढ्या मध्यरात्री तहसीलदारांना दहा ते बारा वेळा फोन करण्याचे कारण काय ? शिवीगाळ करणारा सदर व्यक्ती मोठ्याने आरडा ओरडा करत बंगल्यामध्ये घुसून आत मध्ये आला त्याचवेळी तहसीलदारांनी फोन करून पोलिसांना का बोलवले नाही ? अशीही चर्चा आता सुरू आहे. वाळू तस्करी ही नेहमीच रात्रीच्या वेळेला सुरू असते. ती थेट पहाटेपर्यंत चालते. प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी कुठे आहेत, कोणत्या बंगल्यावर झोपले आहेत याची माहिती वाळूतस्करांना त्यांचे खबरे देत असतात. नेमके असे काय घडले होते की शुभम थोरात याला तहसीलदारांना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दहा वेळा फोन का करावा लागला. याबाबत मात्र तहसीलदार यांनी फिर्यादीत उल्लेख केलेला नाही. फोन करण्याचे कारण नमूद करण्यात आलेले नाही.

संगमनेर तालुक्यातील काही गावे मंत्री विखे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत. या गावांमधील सुद्धा महत्त्वाच्या मोठ्या गावांमधून प्रवरानदी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरूच आहे. दाढ, चिंचपूर, आश्वी या परिसरातून आणि या गावांच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू आहे. इथल्या वाळू तस्करीला कुठलाही आळा बसत नाही. लोणी गावातून देखील वाळू तस्करी सुरूच आहे.

यासह संगमनेर तालुक्यातील मुळा, प्रवरा, आढळा, माळुंगी नद्यातून देखील वाळू तस्करी सुरू आहे. शिवाय जिल्ह्यातील पारनेर, मांडवे या भागासह श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले या तालुक्यातील परिसरात देखील वाळू तस्करी चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यात मोठे नदीपात्र आहे त्या त्या ठिकाणी वाळू तस्करी थांबलेली नाही. मंत्री विखे पाटील यांनी महसूल मंत्री झाल्या झाल्यापासून वाळू तस्करांचा बीमोड करणार असे कितीही ओरडून सांगितले असले तरी त्यांना याबाबत कुठलेही कायमस्वरूपी कारवाई करता आलेली नाही. फक्त महसूल मंत्री पदाची खांदे पालट झाल्याने वाळू तस्करीत कुठलाही फरक पडलेला नाही. उलट वाळू धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना वाळू मिळणे कठीण झाले आहे. शासनाच्या वाळू धोरणानुसार तयार करण्यात आलेले वाळूचे डेपो काही ठिकाणी बंद पडले आहेत. एवढे असतानाही रात्रीच्या वेळी वाळू तस्करी सुरू असल्याचे चित्र आहे.

