संगमनेरात कॅफे चालक झालेत मुजोर ; अनैतिक उद्योगांचे झालेत अड्डे !

संगमनेर पोलिसांचा धाकच राहिला नाही !

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील कॅफे हाऊस मध्ये अल्पवयीन मुलींवर आणि तरुणींवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढत असून या कॅफेमधून अनैतिक उद्योग जोरदारपणे सुरू आहेत. संगमनेर शहर पोलिसांचा मात्र या ‘मुजोर कॅफे चालकांवर’ कुठलाही धाक राहिलेला नाही. असेच घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे.

संगमनेर शहरात दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यामध्ये कॅफे हाऊसचा वापर झाल्याचे आढळून आले आहे. हे कॅफे हाऊस अनैतिक उद्योग करणाऱ्यांचे अड्डे बनले असल्याचे चित्र संगमनेर दिसत आहे.

संगमनेर शहरात आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर कॅफे हाऊस चालविण्यात येत आहेत. दोन अल्पवयीन मुलींवर कॅफेचा आधार घेत लैंगिक अत्याचार करण्यात आला. याआधी देखील अशाच कॅफे हाऊस मधून लैंगिक अत्याचाराच्या घटनांना सुरुवात झाल्याची किंवा घटना घडल्याचे उदाहरणे आहेत. हाणामाऱ्या शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सुद्धा कॅफे हाऊस मधून झालेले आहे. पोलिसांकडून या कॅफे हाऊस चालकांवर कुठलीही कारवाई होत नाही किंवा त्यांची कुठलीही नियमित तपासणी केली जात नाही.

कॅफे हाऊस निर्माण करण्याचे सर्व नियम मोडीत काढून प्रेमी युगुलांना चांगली जागा मिळवून देण्याचे काम कॅफे हाऊस मधून चालू आहे. त्यात हाऊस मध्ये विविध प्रकारे कंपार्टमेंट करून जोडप्यांना निवांतपणा मिळावा याची खास सोय केली जाते. याचा गैरफायदा घेत अनेक अल्पवयीन मुली आणि तरुणींचे लैंगिक शोषण घडत आहे. काही प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत आली आहेत. त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र पोलीस ठाण्यापर्यंत न आलेल्या प्रकरणांचे काय ? त्याचा शोध कोण घेणार ? भीतीपोटी अनेक मुलींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारी दिलेल्या नाहीत. पोलिसांचा आधार त्या कुटुंबियांना वाटत नसल्याचे बोलले जाते. पोलिसांनी विषय अविश्वासाचे वातावरण निर्माण होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

अवैध व्यवसायांवर आणि अशा अनेक अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद वाटते. अधून मधून संगमनेरच्या या कॅफे हाऊस मधून लैंगिक शोषणाची प्रकरणे बाहेर येत आहेत. संगमनेरचे पोलीस त्यास कायमस्वरूपी आळा कधी घालतील ? याची प्रतीक्षा संगमनेरची जनता करित आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!