दूधगंगा पतसंस्था ; गैरव्यवहाराचा कळस गाठला !
अपहार करण्यात चेअरमन आणि कुटुंबीय आघाडीवर !
कोट्यावधी रुपये नातेवाईकांना वाटले तर वैयक्तिक खर्च म्हणून लाखो रुपये वसूल केले
एक आरोपी थोरात साखर कारखान्याचा संचालक !
सहकार खात्याचे अधिकारी आणि लेखापरीक्षक मोकाट कसे ?
विशेष प्रतिनिधी —
सन २०१६ ते २०२१ पाच वर्ष दूधगंगा पतसंस्थेत सुरू असलेला अपहार, पैशांचा गैरव्यवहार याकडे कानाडोळा करणारे आणि दुर्लक्ष करणारे सहकार खात्याचे अधिकारी आणि लेखापरीक्षकही तेवढेच जबाबदार आहेत जेवढे पैशाची ‘हेराफेरी’ करणारे जबाबदार आहेत. सभासद ठेवेदारांनी याप्रकरणी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची कुठलीही दखल गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसून येत आहे. संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे यांनी मनमानी करीत भाऊबंद, नातेवाईक, सगे सोयरे यांना स्वतःच्या स्वार्थासाठी अक्षरश: कोट्यावधी रुपये खिरापती सारखे वाटले असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये संस्थेचा मॅनेजर, चीफ अकाउंटंट सुद्धा सहभागी असल्याचे आढळले आहे.

विशेष म्हणजे सन २०२१ नंतर २०२३ पर्यंत कायदेशीर कारवाई करण्यास उशीर का लागला ? हा संशोधनाचा विषय असून जबाबदारी असणारे सहकार खात्याचे अधिकारी कोणामुळे गप्प होते ? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता ? याचा शोध घेणे, तपास करणे महत्त्वाचे असून आर्थिक गैरव्यवहारात कारवाई होऊ नये म्हणून दबाव आणणारे आणि कारवाई न करणारे अधिकारी, साहेब लोक यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हायला हवेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे.

मुख्य आरोपी पैकी चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. तसेच त्याने थोरात साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पद देखील भूषविले आहे. दादासाहेब भाऊसाहेब कुटे हा आरोपी थोरात साखर कारखान्याचा संचालक आहे. सर्वच आरोपींचे राजकीय वजन जोरदार आहे.

सर्वसामान्य जनतेचा आणि ठेवेदारांचा पैसा गैरमार्गाने वापरण्यात सर्वच आरोपी आघाडीवर असल्याचे दिलेल्या फिर्यादीत दिसून आलेले आहे. त्यामध्ये अनेक मार्गाने पैशाचा गैरव्यवहार आणि गैरवापर झाल्याचे आढळून आले आहे. ठेव पावत्यांची रक्कम ठेवीदारांना न देता बोगस सह्या या करून अपहार करण्यात आला आहे. तसेच कर्ज वसुलीसाठी फेडरेशन देणे रकमा स्वतःच्या नावे करून त्या दोन बचत खातेदारांच्या खात्यावर वर्ग करून त्यामधून विड्रॉल करून स्वतः घेतल्या असल्याचे देखील आढळून आले आहे.

मिळणारे व्याज स्वतःच्या नावे करून केलेला अपहार, बोगस मुदत ठेव अपहार देखील यात नोंदवला गेलेला आहे. बँक ओवरड्राफ्ट कर्ज घेतले ते किर्दीस जमा न घेता अपहार करण्याची रक्कम तर १९ कोटी ६० लाख ९२ हजार ९७ रुपये एवढी आहे. मॅनेजर व संचालक मंडळाचा काही ठिकाणी विरोध असताना चेअरमन यांनी नियमबाह्य असुरक्षितपणे कर्जांचे वाटप केले. या कर्ज वाटपाची रक्कम १८ कोटी ३० लाख ४२ हजार ९०१ रुपये एवढी आहे.

चेअरमन यांनी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांना बोगस कॅश क्रेडिट आणि फिक्स लोन कर्ज दिले त्याची रक्कम १२ कोटी ४ लाख २८ हजार ८६६ एवढी आहे. त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय, पत्नी, मुले, सुना सहभागी आहेत. त्यातच मॅनेजरच्या नावावर ८ कोटी २३ लाख २५ हजार ८५६ रुपये दाखवून स्वतःच्या खात्यावर जमा केल्याचा प्रताप उघड झाला आहे.

मॅनेजर व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर २ कोटी पेक्षा जास्त रक्कम गैरव्यवहार केला आहे. चीफ अकाउंटंट च्या नावाने व कुटुंबीयांच्या नावाने १ कोटी ३२ लाखापेक्षा मोठा गैरव्यवहार करण्यात आला आहे. यामध्ये ८४ लाख ६० हजार ९०९ रुपये चेअरमन भाऊसाहेब कुठे यांच्या नावावर घेण्यात आले आहेत तर ४८ लाख २३ हजार १०८ रुपये मॅनेजरने घेतले आहेत. वृत्तपत्रांना जाहिराती दिल्याचे बिल ६ लाख ९० हजार ७१९ रुपये स्वतःच्या खर्चात टाकून ते सुद्धा कुटे यांनी उकळले आहे.

विशेष म्हणजे अवैधरित्या रिबेट देऊन १ कोटी ५८ लाख ६७ हजार ९७५ रुपये चेअरमन कुटे, मॅनेजर अकाउंटंट यांनी गैरवापर केला आहे. यावर सगळ्यात कळस म्हणजे चेअरमन कुटे यांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चापोटी बँकेतून ८१ लाख १८ हजार ६५२ रुपये उकळले आहेत.

याचबरोबर पतसंस्थेतून गैरव्यवहार करीत आणि पैशांचा गैरवापर करीत अनेक रकमा लाटण्यात आल्याचे दिसून येत आहे. यात चेअरमन भाऊसाहेब कुटे, त्यांचे कुटुंबीय, मित्र, मॅनेजर, चीफ, अकाउंटंट सन १६ ते २१ च्या दरम्यान चे चार कॅशियर तसेच याकडे दुर्लक्ष करणारे सरकार खात्याचे अधिकारी, अंतर्गत लेखापरीक्षण करणारे ऑडिटर, मौन बाळगणारे संचालक या सर्वांची चौकशी होऊन दोषी लोकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पुढे आली आहे.

