दूधगंगा पतसंस्था अपहार ; हमाम मे सब लुटेरे !

गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कोणत्या साहेबांचा प्रयत्न सुरू होता ? चर्चेला उधाण

गुन्हा दाखल होण्यापूर्वी आरोपींना गुन्हा दाखल होणार आहे याची माहिती समजली होती. त्यामुळे ते पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचा आरोप पोलिसांवर होत आहे. शहर पोलीस ठाण्यातील काहीजण ‘आरोपींचे खबरी’  असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते. त्यामुळे पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी भगवान मथुरे यांच्यावर तपास अधिक कसोशीने करण्याची जबाबदारी आली आहे.

 

विशेष प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील सहकारात नावाजलेली व अग्रगण्य असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार बाहेर आला आहे. पाच ते सात वर्षांपासून सुरू असलेला हा अपहार उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. ठेवीदारांचे मात्र नुकसान झाले असून त्यांचे संकट अद्यापही टाळलेले नाही. या अपहारात सहभागी असलेले आणि सध्या आरोपी असलेले पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे, मॅनेजर त्याच बरोबर कुटे यांचे नातेवाईक, सगे सोयरे मित्र आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मात्र गुन्हा जरी दाखल झाला असला तरी पोलिसांच्या तपासात त्रुटी राहिल्या आणि सखोल तपास झाला नाही तर आरोपींच्या बाजूने त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे संगमनेर पोलिसांनी अत्यंत कसून आणि बारकाईने तपास करून सर्व गुन्हेगारांना शिक्षा होईल असे काम करणे अपेक्षित आहे.

फिर्यादीनुसार हा अपहार, घोटाळा सन २०१६ पासून सुरू झाल्या असल्याचे म्हटले आहे. मात्र तो सन २००१ पासूनच सुरू झाला असावा असा कयास आहे. पतसंस्थेने स्वतःची भव्य दिव्य इमारत ज्यावेळेस बांधली त्यावेळेस सुद्धा त्या बांधकामाच्या नावाखाली अपहार झाला असावा अशी चर्चा ऐकण्यास मिळते. त्यामुळे नातेवाईकांना, सगे सोयऱ्यांना अगदी खिरापती सारखे नियमबाह्य कर्ज वाटप, कोट्यावधी रुपयांची मदत आणि त्यातून विविध ठिकाणी घेतलेल्या जागा, स्थावर मालमत्ता, सोने चांदी, दागिने याचा सुद्धा पोलिसांनी छडा लावायला हवा. या प्रकरणाचा संपूर्ण तपास अगदी सखोल होणे गरजेचे आहे.

२१ व्यक्तींवर गुन्हा जरी दाखल झाला असला तरी अनेकांना गुन्ह्यापासून अलिप्त ठेवले असल्याचे बोलले जात आहे. कोण – कोणाला वाचवत आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. सहकार खात्याचे पतसंस्थेच्या नियमित तपासणीबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. ऑडिटर यात पूर्णपणे दोषी आहेत. सन २०१६ पासून २०२३ पर्यंत ऑडिट मध्ये जर संस्थेच्या अपहाराबाबत उल्लेख असेल किंवा गैरव्यवहारांच्या नोंदी असतील किंवा केलेले व्यवहार नियमबाह्य आणि गैर पद्धतीचे असतील तर ऑडिट करणाऱ्या लेखापरीक्षकांनी तातडीने पावली का उचलली नाहीत ? यासह अनेक विषयांवर ठेवीदार, सभासदांमध्ये चर्चा आणि आरोप होत आहेत. हा शंका घेण्याचा विषय  आहे. अपहार झाल्याचे स्पष्ट होऊनही गुन्हा दाखल करण्यास वेळ का लागला ? हा तर सर्व संगमनेर करांना माहीत होण्यासाठी महत्त्वाचा विषय ठरला आहे.

कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असताना गुन्हा रोखण्याबाबत, संगमनेर प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये, तसेच मिटवा मिटवी करण्यात नेमके कोणते ‘साहेब’ कार्यरत होते  याचा ही तपास करणे गरजेचे आहे. अपहार होऊनही गुन्हा दाखल करण्याबाबत सहकार खात्यांवर दबाव येत असेल तर त्या साहेबांचा नेमका इंटरेस्ट काय ? हाही चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी तपास करताना सर्व बाबींचा विचार करायला हवा. गुन्हा दाखल होण्यापूर्वी आरोपींना गुन्हा दाखल होणार आहे याची माहिती समजली होती. त्यामुळे ते पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचा आरोप पोलिसांवर होत आहे. शहर पोलीस ठाण्यातील काहीजण ‘आरोपींचे खबरी’ असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते. त्यामुळे पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी भगवान मथुरे यांच्यावर तपास अधिक कसोशीने करण्याची जबाबदारी आली आहे.

कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेणारी मंडळी, नियमबाह्य कर्ज घेणारी मंडळी, दुसऱ्यांच्या नावावर कर्ज घेणारी मंडळी तसेच हे सर्व वाटप करणारी ‘टोळी’ हे सर्व राज्यातील बड्या नेत्यांचे सगे सोयरे, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे पतसंस्थेतून वापरलेला पैसा आणि त्या पैशातून उभी राहिलेली विविध ठिकाणाची ‘इस्टेट’ याची देखील तपासणी होणे गरजेचे आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!