शासन आपल्या दारी विद्यार्थ्यांनो बसा घरी !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना धरून त्यांचे शैक्षणिक नुकसान करणे हे कोणत्या तत्त्वात बसते असा सवाल करीत ‘शासन आपल्या दारी विद्यार्थ्यांनो बसा घरी’ असा कार्यक्रम आज महाराष्ट्र सरकारने राबविला असल्याचा आरोप विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान छात्र भारती संघटनेने तीव्र संताप व्यक्त करीत शासनाचा निषेध केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळच्या काकडी गावात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी परिवहन महामंडळाच्या सुमारे ६०० एसटी बसचे वाहतुकीसाठी नियोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातील हजारो लाभार्थ्यांच्या प्रवासासाठी या बसेस वापरण्यात आल्या. यामुळे काही आगारात ग्रामीण भागातील आणि शाळकरी मुलांसाठी सोडण्यात येणाऱ्या शालेय फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आज बसेस रद्द केल्याच्या सूचना स्थानकावर अचानकपणे लावल्याने विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे मोठे हाल झाले. विद्यार्थ्यांनी याबाबत संताप देखील व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकार आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली आहे. “शासन येई दारी, विद्यार्थी बसे घरी” असे म्हणत दानवे यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे.

दानवे यांनी समाज माध्यमातून ट्वीट करत म्हटले आहे की, “शासन येई दारी, विद्यार्थी बसे घरी”. सरकार आपल्या दारी येत असल्याचा देखावा करून एखाद्या आगराच्या सगळ्या बस अडकवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे, हे कोणत्या तत्वात बसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदय अश्या फेऱ्या रद्द होणार होत्या, तर शेजारील आगारातून अतिरिक्त बसची सोय का करण्यात आली नाही? विद्यार्थ्यांना वेठीस का धरता? असे सवाल दानवे यांनी उपस्थित केले.

