हे कसले पोलादी पुरुष, हे तर तकलादू पुरुष !
उद्धव ठाकरेंचा घणाघात
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
मराठवाडा मुक्तिसंग्रामात सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान फार मोठं आहे. वल्लभभाई पटेलांनी मराठवाड्यात कारवाई केली, तशी कारवाई मणिपूरमध्ये करण्याची हिंमत नाही आणि स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेतात. हे कसले पोलादी पुरुष, हे तर तकलादू पुरुष असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

जळगाव महापालिकेतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, अशा सोहळ्यासाठी उत्साहाने उपस्थित राहिलात याचं खरंच कौतुक आहे. इथे जास्त बोलत नाही कारण जाहीर सभेत मी बोलणार आहे. आता मी उभा असलो तरी हे स्टेज हलतंय. मी मनात विचार केला की हे स्टेज कसं हलतंय. एकूणच केंद्र सरकार डगमगायला लागलंय, हे त्याचं प्रतीक आहे. केंद्र सरकार हलतंय. आज मला माझ्या महापौर, उपमहापौर आणि सगळ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे. पुतळा तसा कुणाचाही उभा करता येतो, पण पोलादी पुरुष म्हणून, नावाचे नाही तर कामाचे, नाव लावून कुणी काहीही करू शकतं, पण काम करून जनतेकडून उपाधी मिळवणारी तुरळ व्यक्तिमत्त्व होऊन गेली, त्यातील एक सरदार पटेल हे एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात उभारलात आणि त्याचं अनावरण करण्याची संधी दिलीत म्हणून मी धन्यवाद देतो, अशा शब्दांत त्यांनी आभार व्यक्त केले.

सरदार पटेलांविषयी गौरवोद्गार काढताना त्यांनी केंद्रातील सरकारवर आसूड ओढले. उद्धव ठाकरे म्हणाले की, वल्लभभाई पटेल हे दूरदृष्टीचे होते. त्यांनी त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. त्या व्यक्तिला स्वातंत्र्यप्रेम म्हणजे काय, देशप्रेम म्हणजे काय हे पक्क कळत होतं. यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा कुठे उभा केलाय, तुम्हाला माहितीये. पुतळ्याची उंची ठीक आहे, कामाची उंची कधी गाठणार. जे काम वल्लभभाईंनी केलंय, ती उंची तुम्ही गाठा ना. आता १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा त्यांनी स्वतंत्र केला होता आपल्या भारतात. आता भारत म्हटलं पाहिजे कारण काहींना इंडिया शब्दाने ॲलर्जी व्हायला लागली आहे. आतापर्यंत व्होट फॉर इंडिया होतं, आता आपण इंडिया म्हटल्यावर त्यांना खाज सुटली. जो मराठवाडा त्यांनी देशात सामील करून घेतला ती तारीख आता चार पाच दिवसांनी येतेय. विशेष म्हणजे त्याहीवेळेला काही लोक असे होते. नेमकं त्याच दिवशी जिन्नांचं निधन झालं होतं, काहींचं म्हणणं की हे बरं दिसणार नाही. पण, वल्लभभाईंनी त्याला नकार दिला. त्यांनी फौजा घुसवून निजामाला हुसकावलं आणि रझाकारांचे अत्याचार थांबवले आणि मराठवाडा अभिमानाने आपल्या देशात सामील करून घेतला. आज आपण पुतळे उभारतोय पण जशी मराठवाड्यात वल्लभभाईंनी कारवाई केली, तशी मणिपूरमध्ये कारवाई करण्याची हिंमत होत नाही आणि स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेतात. हे कसले पोलादी पुरुष, हे तकलादू पुरुष आहेत. अशा या कारभाराचा आपल्याला आता सोक्षमोक्ष लावायचा आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

