भारत जोडो यात्रा देशाला दिशा देणारी – आमदार थोरात
भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त संगमनेरात काँग्रेसची पदयात्रा
प्रतिनिधी —
खासदार राहुल गांधी यांनी भारतीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेरात विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पदयात्रेत युवक, महिला, नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध ठिकाणी झालेले उत्स्फूर्त स्वागतासह भारत जोडो यात्रा ही देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली असून सर्व रेकॉर्ड मोडणाऱ्या या यात्रेचा आपल्या सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोदगार या यात्रेचे समन्वयक आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेर नगरपालिका ते नवीन नगर रोड अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सभेत व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नाशिकचे राजाराम पानगव्हाणे, महिला काँग्रेसच्या सचिव उत्कर्षा रुपवते आदींसह संगमनेर तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्याची दहा वर्ष तुरुंगात काढली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. हा देश व लोकशाही टिकवण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ३ हजार ५६० किलोमीटरची पदयात्रा केली. या पदयात्रेत ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना सोबत घेऊन चालत होते. विविध संघटना व लोकशाहीवर विश्वास असणारे सर्वजण एकत्र येत होते.

महाराष्ट्रात देगलूर पासून सुरू झालेली यात्रा सात जिल्ह्यातून गेली. अत्यंत उत्साहात सर्वांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद व शेगावची झालेली ऐतिहासिक सभा हे या यात्रेचे मोठे वैशिष्ट्य ठरले. रेकॉर्ड ब्रेक असणारी ही पदयात्रा देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली आहे.

माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी भाजपा विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे. देशात सर्वत्र अशांतता आहे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. जाती धर्माच्या नावावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे यावेळी उत्कर्षा रूपवते यांनीही मनोगत व्यक्त केले.

पदयात्रेचे शहरात उत्स्फूर्त स्वागत
शहरात संपूर्ण पदयात्रेत नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा पदयात्रेवर पुष्पवृष्टी केली. विविध ठिकाणी महिला भगिनींनी औक्षण केले, तरुणाईचा मोठा जल्लोष, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजीत या पदयात्रेत रिमझिम पावसातही सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. भारत जोडो, नफरत छोडो घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून गेले.

