देशात लोकशाही आणि पत्रकारितेची मुस्कटदाबी सुरू आहे – माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात
प्रतिनिधी —
सन २०१४ पासून पत्रकारितेवर आघात सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवर न्यूज चॅनल्स हे भाजपचे प्रचारक असल्यासारखे काम करत असल्याचे दिसत आहे. वस्तुस्थिती आणि घडणाऱ्या घटना पासून ते कायम दूर राहिल्याचे चित्र आहे. पत्रकारिता हा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. भाजपने कायम पत्रकारितेची आणि लोकशाहीची मुस्कटदाबी केली आहे. असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथील पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

ज्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्याच्यावर कारवाई न करता वाईट उद्योग उघड करणाऱ्या लोकशाही चॅनलचे पत्रकार यांच्यावरच गुन्हा दाखल केला यातूनच पत्रकारितेची मुस्कटदाबी सुरू असल्याचे दिसून येत असल्याचेही थोरात म्हणाले.

भारत आणि इंडिया या दोन्ही नावाबाबत काँग्रेसला नेहमीच आदर आहे. श्रद्धा आहे. असे असताना देशपातळीवर इंडिया नावाचा जी सर्व विरोधी पक्षांची एक आघाडी झाली आहे आणि या आघाडीच्या बैठका सुरू झाल्याने जनतेमध्ये जे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनमानस भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जात आहे. विरोधकांचे संघटन चांगल्या पद्धतीने होत आहे. याचा धसका आणि भीती भारतीय जनता पक्षाने, केंद्र सरकारने घेतली आहे. इंडिया शब्दाचा धसका एवढा घेतला आहे यातूनच त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकत असल्याचे चित्र यातून दिसून येत आहे.

देशातील बदलते वातावरण पाहता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती दोलायमान झाली आहे. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आता सत्ता कशी वाचवायची यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सत्ता वाचवण्यासाठी त्यांचे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा न करता, राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा न करता वेगळ्याच विषयांवर चर्चा करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे असा खटाटोप सुरू असल्याचा आरोप देखील आमदार थोरात यांनी केला आहे.

