संगमनेर तालुक्यातील गावागावात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस मोठा प्रतिसाद
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत युवकांसह, नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात देवकौठे, निमोन, तळेगाव, या विविध गावांमध्ये काँग्रेस पक्षाचे जनसंवाद यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तरुणांचा सहभाग व घोषणांचा जयजयकार यामुळे या पदयात्रा लक्षवेधी ठरल्या.

देशात निर्माण झालेली अस्थिरता, महिलांवरील वाढते अत्याचार ,वाढलेली महागाई आणि तरुणांचा भ्रमनिरास होऊन मोठ्या प्रमाणात आलेली बेरोजगारी यामुळे संपूर्ण देशभरात अस्वस्थता आहे. केंद्र व राज्य सरकार हे फक्त जाहिरात बाजी आणि घोषणाबाजी करत आहे अद्याप त्यांची एकही घोषणापूर्ती झाली नसून नवनव्याने मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत.

राज्यभरासह संगमनेर तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन सह इतर खरिपाची पिके पूर्णतः वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी मोठा हवालदिल झाला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई व चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आमदार थोरात यांनी सरकारकडे सातत्याने मागणी केली असून सरकारने अद्यापही कोणतीही कार्यवाही केली नाही असा आरोप स्थानिक काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे.

आमदार थोरात यांनी मोठ्या प्रयत्नातून धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. त्यांच्याच सूचनेवरून उन्हाळ्यामध्ये डाव्या कालव्याला सरकारने पाणी सोडले. आता या भागात तीव्र टंचाई निर्माण झाली असून आमदार थोरात यांनी डाव्या कालव्यातून तातडीने निळवंडे चे पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. यावर सरकार कधी पाणी सोडते ही सर्वजण वाट पाहत आहोत. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.

